...अन् दुकानदाराने भंगवले त्याचे ‘पोलिस’ बनण्याचे स्वप्न ! - the shopkeeper shattered his dream of becoming a policeman | Politics Marathi News - Sarkarnama

...अन् दुकानदाराने भंगवले त्याचे ‘पोलिस’ बनण्याचे स्वप्न !

अनिल कांबळे
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

अजय जाधव हा पोलिसांना ठाण्यात आणल्यानंतरही एपीआय असल्याचा दावा करीत होता. त्याच्याकडे महाराष्ट्र पोलिसाचा लोगो असलेले आयकार्ड, नेमप्लेट आणि बाहेरगावी तपासासाठी जात असल्याची ड्युटी पास (डीपी) होती. त्यामुळे तो गेल्या काही वर्षांपासून तोतया पोलिस बनत असल्याचे लक्षात आले. अजयला लॉकअपमध्ये दोन बाजीराव पडताच तो पोपटासारखा बोलू लागला.

नागपूर : एक व्यक्ती एका दुकानात आपल्या वर्दीवरील स्टार, शूज, बेल्ट आणि टोपी खरेदी करीत होता. पोलिस अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न होते. पण शिकून सवरून नव्हे, तर फक्त वर्दी घालून, धाक जमवून लोकांना लुटण्याचा त्याचा प्लान होता. याची भनक दुकानदाराला लागताच त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केला. त्याची साहित्याची खरेदी होण्यापूर्वीच तेथे खरेखुरे पोलिस आले आणि त्याचे ‘पोलिस’ होण्याचे स्वप्न भंगवले. दुकानदाराच्या प्रसंगावधानामुळे असामाजिक तत्व समाजात मिसळण्यापासून वाचले. हा तोतया पोलिस जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील अजय शिवदास जाधव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अजय जाधव हा सीताबर्डी बाजारातील फ्रेण्ड्स कापडाच्या शोरूममध्ये आला. त्याने पोलिसांच्या वर्दीसाठी लागणारे साहित्य मागितले. तीन स्टार, राऊंड कॅप, लाल शूज, केन आणि नेम प्लेट खरेदी करायचे असल्याचे सांगितले. दुकानदाराने त्याला विचारणा केली असता त्याने चंद्रपूर पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक असल्याचे त्याने दुकानदाराला सांगितले. 

दुकानदाराला संशय आला. दुकानदाराने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिस नियंत्रण कक्षाने सीताबर्डी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी अजयला ओळखपत्र मागितले. ओळखपत्र द्यायला तो तयार नव्हता. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली. पिशवीत पट्टा आढळला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजयला अटक केली.

पोलिस अधिकारी बनून वाहनचालकांना थांबवायचे. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून दंडाची भीती दाखवून पैसे कमवायचे, असा प्लान अजयने बनविला होता. त्यामुळे त्याने पोलिस शिपाई बनण्यापेक्षा थेट एमपीएससी पास असलेला सहायक पोलिस निरीक्षक बनण्याचे ठरविले होते. मात्र अधिकारी बनण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.

अजय जाधव हा पोलिसांना ठाण्यात आणल्यानंतरही एपीआय असल्याचा दावा करीत होता. त्याच्याकडे महाराष्ट्र पोलिसाचा लोगो असलेले आयकार्ड, नेमप्लेट आणि बाहेरगावी तपासासाठी जात असल्याची ड्युटी पास (डीपी) होती. त्यामुळे तो गेल्या काही वर्षांपासून तोतया पोलिस बनत असल्याचे लक्षात आले. अजयला लॉकअपमध्ये दोन बाजीराव पडताच तो पोपटासारखा बोलू लागला.
(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख