महाविकास आघाडी कायम ठेवावी, ही शिवसेनेची इच्छा; पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा नकार… - shivsena wants to maintain mahavikas aghadi but congress and ncp rejects | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

महाविकास आघाडी कायम ठेवावी, ही शिवसेनेची इच्छा; पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा नकार…

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 जून 2021

पोटनिवडणुकीत सोबत घेतल्यास काही जागा सेनेला सोडाव्या लागतील. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. याच कारणाने राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला अद्याप होकार दिला नाही.

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तिन्ही पक्षांनी सोबत लढाव्या, असे वाटणे गैर नाही. पण नागपूर जिल्हा परिषद Nagpur Zillha Parishad निवडणुकीसाठी परवा कॉंग्रेस Congress आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने NCP सोबत लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावाला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अद्याप उत्तर मिळाले नाही. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना एकटी पडल्याचे चित्र आहे. आता शिवसेना एकटी लढणार का, हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल MLA Ashish Jaiswal यांच्याशी संपर्क साधला, पण याबाबत सध्यातरी उत्तर मिळाले नाही. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नागपूर जिल्ह्यात एकटी पडली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सेनेने प्रस्ताव दिला होता. मात्र अद्याप उत्तर आले नसल्याने आता शिवसेनेने एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्र सांगतात. मात्र यास नेत्यांनी अधिकृत दुजोरा दिला नाही. जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या सात आणि राष्ट्रवादीच्या चार जागा रिक्त झाल्या आहेत. याशिवाय भाजपच्या चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत वापरण्यात आलेला फॉर्म्युला कायम ठेवण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसने घेतला आहे. राज्यात महाविकास आघाडी असल्याने पोटनिवडणुकीतही ती कायम ठेवावी, अशी मागणी शिवसेनेची आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे फक्त दोनच सदस्य निवडून आले आहेत. त्यांच्या एकाही सदस्यांचे सदस्यत्व गेलेले नाही. 

पोटनिवडणुकीत सोबत घेतल्यास काही जागा सेनेला सोडाव्या लागतील. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. याच कारणाने राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला अद्याप होकार दिला नाही. रामटेक, नरखेड तालुक्यातील काही पॉकेट्‍स शिवसेनेचे आहेत. त्याव्यतिरिक्त संपूर्ण जिल्ह्यात इतरत्र कुठेही शिवसेनेची ताकद नाही.

शिवसेना स्वतंत्रपणे सर्व जागांवर लढल्यास त्याचा फटका भाजपला अधिक बसण्याची शक्यता आहे. हा विचार करून शिवसेनेने स्वतंत्रपणे लढावे, असे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा असल्याचे समजते. राजकीय घडामोडी तसेच निर्णयाबाबत बोलण्याचे अधिकार शिवसेनेत कोणाकडेही नाही. त्यामुळे सर्वच नेते शांतता बाळगून असल्याची सूत्रांची माहिती आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख