शिवसेना आणि एमआयएम यांची युती : विळ्याभोपळ्याच्या सख्याची राजकीय चर्चा

अमरावतीतील राजकीय समीकरणांची देशभर चर्चा
thackeray-owaisi
thackeray-owaisi

अमरावती : अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. त्याला कारणही तसेच ठरले आहे. शिवसेना आणि एमआयएम हे विळ्य़ाभोपळ्याचे सख्य असलेले पक्ष या निवडणुकीत एकत्र आले. त्याचीच चर्चा जास्त झाली आहे.

या स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपचे सचिन रासणे निवडून आले. त्यांना अपेक्षेप्रमाणे नऊ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना सहा मते मिळाली. स्थायी समितीच्या निवडणुकीत या वेळी नवे राजकीय समीकरण उदयास आले. विरोधकांनी बेरजेचे गणित मांडले, मात्र बसपने ऐनवेळी साथ सोडल्याने राजकीय गणित बिघडले. या राजकीय बेरजेत एमआयएमच्या उमेदवारास शिवसेनेच्या सदस्य जयश्री कुरेकर यांनी मतदान करून नव्या राजकीय समीकरणास 11 मार्च रोजी जन्म दिला.

सत्ताधारी भाजपकडे नऊ आणि विरोधकांकडे सात मते होती. सुरवातीला काॅंग्रेसचा उमेदवार विरोधात देण्याच ठरले. मात्र बसपाने त्यास आक्षेप घेतला. मग बसपाचे नगरसेवका चेतन पवार यांनाच उमेदवारी देण्याचे ठरले. मात्र बसपाच्या उमेदवाराने विरोधकांनाच धक्का देत निवडणुकीत भाग घेतला नाही. ते तटस्थ राहिले. त्यामुळे मग एमआयएमचे हुसेन यांना विरोधकांनी ऐनवेळी उमेदवारी दिली. त्यांना काॅंग्रेस आणि शिवसेनेने मदत केली. मात्र त्यांचा पराभव झाला. भाजप उमेदवार रासणे यांना नऊ आणि एमआयएमचे हुसेन यांना सहा मते मिळाली.

एमआयएमच्या उमेदवारास सेनेने मतदान केल्यानंतर साहजिकच अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्थानिक पातळीवरील युती म्हणून याबाबत भाष्य करण्याचे टाळले. 

भाजपमध्ये धुसफूस
सत्ताधारी भाजपमधील नाराजी या निवडणुकीच्या निमित्ताने उघड झाली. नऊ सदस्य असल्याने सहज निवडून येण्याची शक्‍यता ऐनवेळी मावळण्यात जमा झाली होती. अर्ज दाखल करताना दोन सदस्यांनी बंड पुकारले. पक्षाकडून रासणे यांचे नाव आल्याचे बघून या स्पर्धेत असलेल्या चंद्रकांत बोमरे व रिता पडोळे यांनी सर्वांसमक्ष नाराजी व्यक्त करीत महापौर कक्षातून बहिर्गमन केले. त्यांची नंतर मनधरणी करण्यात आली. मतदानानंतर मात्र दोघेही निवडणूक कक्षातून नाराजी व्यक्त करीत निघून गेलेत.
----
कॉंग्रेसला बसपचा धक्का
भाजपचा सहकारी पक्ष युवा स्वाभिमानच्या सदस्यानेही नाराजीचा सूर आवळला होता. ही नाराजी विरोधकांच्या पथ्यावर पडणारी होती. हा सदस्यही मतदानाच्या वेळेपर्यंत आला नव्हता. कॉंग्रेसने शिवसेना, एमआयएम व बसप मिळून सात सदस्यांची मोट बांधली होती. युवा स्वाभिमानचा सदस्य मिळून आठ संख्याबळ होणार होते. त्यामुळे चुरस निर्माण होऊन चिठ्ठीची वेळ येणार होती. मात्र बसपच्या सदस्याने ऐनवेळी हुलकावणी दिल्याने बेरजेचे गणित बिघडले. नाराज सदस्याने नंतर भाजपच्या बाजूने मतदान केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com