शिवकुमारची जामिनासाठी धडपड; तपास अधिकाऱ्यांनी ३० जणांचे बयाण नोंदविले  - shivkumars struggle for bail investigators recorded the statements of thirty people | Politics Marathi News - Sarkarnama

शिवकुमारची जामिनासाठी धडपड; तपास अधिकाऱ्यांनी ३० जणांचे बयाण नोंदविले 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 13 एप्रिल 2021

या प्रकरणामध्ये तत्कालीन मेळघाट व्याघप्रकल्प संचालक व क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांचे या प्रकरणात शासनाने निलंबन केले. परंतु अद्याप त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. यासंदर्भात विविध राजकीय पक्ष व संघटनांनी रेड्डीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी रेटून धरली होती.

अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आणि अटकेत असलेला आयएफएस अधिकारी विनोद शिवकुमार याने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या गुरुवारी अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तपास अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ३० जणांचे बयाण नोंदविले आहे. 

तीन दिवसांपूर्वीच त्यांनी जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता, असे उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील यांनी सांगितले. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक असलेले विनोद शिवकुमार हे काही दिवस धारणी पोलिसांच्या कोठडीत होते. त्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीअंतर्गत त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहामध्ये केली. या प्रकरणाचा तपास एसडीपीओ पूनम पाटील यांच्याकडे आहे. त्यांनी आतापर्यंत वनकर्मचारी, अधिकाऱ्यांसह आवश्‍यक अशा पंचवीस ते तीस जणांचे बयाण नोंदविले आहे. त्यात दीपाली यांच्या आईसह दीपाली यांच्या पतीचाही समावेश आहे. 

या प्रकरणामध्ये तत्कालीन मेळघाट व्याघप्रकल्प संचालक व क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांचे या प्रकरणात शासनाने निलंबन केले. परंतु अद्याप त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. यासंदर्भात विविध राजकीय पक्ष व संघटनांनी रेड्डीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी रेटून धरली होती. या प्रकरणात दीपाली यांचा मोबाईल, संगणक, त्यांनी केलेला पत्रव्यवहाराचा काही भाग, शिवाय त्यांनी आत्महत्येपूर्वी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली तीन पत्रे पोलिसांनी आतापर्यंत जप्त केली आहेत. 
 
दीपाली यांच्या आत्महत्येस कोण दोषी आहेत? या प्रकरणाची प्राथमिक चौकशी महिला आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपविली आहे. त्यांची चौकशी वनविभागाशी संबंधित आहे. पोलिसांचा घटनेशी संबंधित तपास सुरू आहे. 
-डॉ. हरिबालाजी एन. 
पोलिस अधीक्षक, अमरावती. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख