लॉकअपमध्ये गेली शिवकुमारची रात्र, धारणी पोलिसांनी घेतली बंगल्याची झडती...  - shivkumars night in lock up dharni police raided the bungalow | Politics Marathi News - Sarkarnama

लॉकअपमध्ये गेली शिवकुमारची रात्र, धारणी पोलिसांनी घेतली बंगल्याची झडती... 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 मार्च 2021

दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या पत्रात काही लोक वरिष्ठांचे कान भरत असल्याने आपला त्रास वाढल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे लोकं कोण आहेत, याचा शोधसुद्धा धारणी पोलिस घेत आहेत. अशा लोकांवरदेखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. 

धारणी (जि. अमरावती) : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी धारणी न्यायालयाने विनोद शिवकुमार याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची कालची रात्र लॉकअपमध्ये गेली. आजही त्याला लॉकअपमध्येच ठेवण्यात येणार आहे. धारणी पोलिसांनी काल त्याच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली. पोलिसांनी कालपासूनच तपासाला सुरुवात केली आहे. विविध दिशेने पोलिसांचा तपास सुरू असून त्यात मोबाईल व लॅपटॉपची तपासणी करण्यात आली. सोबतच अन्य माहितीसुद्धा गोळा करण्यात येत आहे. 

काल दुपारी धारणी पोलिसांचे एक पथक विनोद शिवकुमारच्या चिखलदरा येथील बंगल्याच्या तपासणीकरिता गेले होते. त्यांनी बंगल्याची कसून तपासणी केली. या पथकात मोर्शीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गीते, पोलिस कॉन्स्टेबल सचिन होले यांच्यासह धारणी पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या झडतीत काय हाती लागले, याची माहिती मात्र पोलिसांनी सध्या दिलेली नाही. तपासाच्या दृष्टीने आवश्‍यक त्या बाबी तपासण्यात आल्या असून योग्यवेळी माहिती दिली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या पत्रात काही लोक वरिष्ठांचे कान भरत असल्याने आपला त्रास वाढल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे लोकं कोण आहेत, याचा शोधसुद्धा धारणी पोलिस घेत आहेत. अशा लोकांवरदेखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा : Breaking पिंपरीच्या नगरसेविकेच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांच्या मृत्यूला शिवकुमार सर्वस्वी जबाबदार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे शिवकुमारला अटक करण्यात आली. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याने कालची रात्र त्याला धारणी पोलिसांच्या लॉकअपमध्येच राहावे लागले. आणखी एक रात्रसुद्धा त्याला येथेच काढावी लागणार असून उद्या, सोमवारी त्याला परत न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

सहकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली 
दीपाली चव्हाण यांना सुसर्दा वनपरिक्षेत्राच्या कार्यालयात वनविभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी रात्री श्रद्धांजली वाहिली. या वेळी वनविभागाच्या महिला कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख