२३ वर्षांपासून अभेद्य असलेला शिवसेनेचा ‘हा’ गड उद्या ढासळणार ?
Bhadrawati NP

२३ वर्षांपासून अभेद्य असलेला शिवसेनेचा ‘हा’ गड उद्या ढासळणार ?

२८ सदस्यीय या पालिकेत भाजपचे ३ नगरसेवक आहेत. भाजप वगळता इतर छोट्यामोठ्या आणि अपक्ष नगरसेवकांचा पालिकेत शिवसेनेला पाठिंबा आहे. सेनेच्या नगरसेवकांसोबत भाजपचे ३ नगरसेवकसुद्धा कॉंग्रेसवासी होऊ शकतात, अशी चर्चा आहे.

चंद्रपूर : गेल्या तेवीस वर्षांपासून Since last 23 years निर्विवाद वर्चस्व असलेल्या भद्रावती नगर पालिकेतील शिवसेनेच्या Shiv Sena अभेद्य गडाला आता सुरुंग लागण्याची शक्यता आहे. उद्या गुरूवारी सकाळी भद्रावती येथे आयोजित कॉंग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांच्या उपस्थित शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

शिवसेनेला खिंडार पडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना सेनेचे संपर्क प्रमुख तातडीने भद्रावती येथे आज सायंकाळी पोहोचले. कॉंग्रेसवासी होऊ इच्छिणाऱ्या नगरसेवकांचे मन वळविण्याचे त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश आले, ते उद्या पटोले यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात बघायला मिळणार आहे. पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या ताब्यातील ही एकमेव नगरपालिका आहे.
भद्रावती नगर पालिकेची स्थापना १५ ऑगस्ट १९९८ रोजी झाली. स्थापनेपासून तर आजतागायत सेनेचा भगवाच या पालिकेवर फडकला. 

आधी माजी आमदार साळुंखे गुरूजी आणि त्यानंतर तत्कालीन आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने पालिकेवर वर्चस्व राखले. धानोरकर यांच्या रूपात सेनेचा पहिला आमदार याच मतदारसंघातून निवडून आला. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर कॉंग्रेसवासी होऊन खासदार झाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत खासदार धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर 
कॉंग्रेसच्या आमदार झाल्या. त्यांचे बंधू आणि भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर मात्र शिवसेनेतच राहिले. तेव्हापासून त्यांच्या भूमिकेकडे सेनेच्या नेत्यांनी संशयानेच बघितले आहे. 

धानोरकर दाम्पत्य कॉंग्रेसचे खासदार-आमदार झाल्यानंतर भद्रावती पालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात होती. तो प्रयत्न आता टप्प्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना कॉंग्रेस प्रवेशाच्या चर्चेला स्पष्ट शब्दात नकार दिला. आपण शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेतच राहणार, असे त्यांनी ‘सरकारनामा’ शी बोलताना सांगितले. ते नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून निवडून आले आहेत. दुसरीकडे नगरसेवकांनाही पक्षांतर बंदी कायद्याची भिती सेनेकडून दाखविली जात आहे. 

सध्या पालिकेत शिवसेनेचे १७ नगरसेवक आहेत. वेगळा गट स्थापन करण्यासाठी एक तृतांश नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे उद्या नेमके किती नगरसेवक कॉंग्रेसवासी होणार, याकडे सेना नेत्यांचे लक्ष लागले आहे. पालिकेतील विद्यमान सेनेची सत्ता बाळू धानोरकर आमदार असताना त्यांच्या नेतृत्वात आली. शिवसेनेचे नगरसेवक त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे हा आकडा सहज गाठला जाऊ शकतो, असा विश्वास कॉंग्रेसच्या वर्तुळात आहे. पालिकेची निवडणूक होण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे नगरसेवकसुद्धा सावध भूमिका घेऊन आहे. दुसरीकडे पूर्व विदर्भातील एकमेव पालिका राखण्याचे आव्हान शिवसेनेसमोर उभे ठाकले आहे. 

पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख प्रशांत कदम तातडीने भद्रावती येथे पोहोचले. तत्पूर्वी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून काही नगरसेवकांचे मन वळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नवा गट स्थापन करण्याएवढी संख्या कॉंग्रेसमध्ये जाणार नाही. अनेक नगरसेवक पक्षाच्या विचारधारेशी जुळले आहेत. ते सेनेतच राहतील. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, अशा इशारा कदम यांनी दिलेला आहे. मात्र सेनेचे काही नगरसेवक आणि पदाधिकारी उद्या कॉंग्रेसवासी होतील, याबाबत आता कुणाच्या मनात संशय राहिलेला नाही. तो आकडा नेमका किती असेल आणि नगराध्यक्ष अनिल धानोरकर काय भूमिका घेतात हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे. 

२८ सदस्यीय या पालिकेत भाजपचे ३ नगरसेवक आहेत. भाजप वगळता इतर छोट्यामोठ्या आणि अपक्ष नगरसेवकांचा पालिकेत शिवसेनेला पाठिंबा आहे. सेनेच्या नगरसेवकांसोबत भाजपचे ३ नगरसेवकसुद्धा कॉंग्रेसवासी होऊ शकतात, अशी चर्चा आहे.  कॉंग्रेसचा भद्रावती ‘भाजपमुक्त’ करण्याचा हा प्रयत्न आहे.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in