खासदार धानोरकरांनी शिवसेना फोडण्यासाठी फिल्डींग लावली.. पण सेनेने तटबंदी राखली!

शिवसेना-भाजपच्या शेकडो आजी माजी पदाधिकाऱ्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. धानोरकर सेनेत असतानाच हेनगरसेवक आणि बाजार समिती ताब्यात घेतल्या होत्या. आता त्यांनी जुन्या सहकाऱ्यांना कॉंग्रेसमध्ये आपल्या सोबत घेतले. त्यामुळे या मतदारसंघात सेनेला चांगला हादरा बसला आहे.
खासदार धानोरकरांनी शिवसेना फोडण्यासाठी फिल्डींग लावली.. पण सेनेने तटबंदी राखली!
Sarkarnama

चंद्रपूर : मागील तेवीस वर्षांपासून शिवसेनेने Shivsena एक हाती राखलेल्या भद्रावती नगर परिषदेच्या Bhadravati गडाला सुरुंग लावण्याचा कॉंग्रेसचा Congress प्रयत्न काही तांत्रिक कारणांमुळे अपयशी ठरला. शिवसेनेने पालिकेचा गड तुर्तास राखला. मात्र शिवसेनेचे वरोरा Warora पालिकेतील सर्वच नगरसेवक, मतदार संघातील दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितींचे सभापती, काही सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसमध्ये आज  प्रवेश घेतला. 

गड राखला असला तरी शिवसेनेची तटबंदी मात्र पुरती ढासळली. भाजपचे तीनही नगरसेवक कॉंग्रेसवासी झाले आणि यानिमित्ताने भाजपमुक्त भद्रावतीची मुहूर्तमेढ कॉंग्रेसने रोवली. कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने भद्रावती येथे मेळाव्याचे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार होते. पटोले यांना दिल्लीतून तातडीने बोलवणे आले. त्यामुळे त्यांनी सर्वच नियोजित कार्यक्रम रद्द केले. या मेळाव्याच्या निमित्ताने मागील आठवडाभरापासून भद्रावतीचे शिवसेनेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर आणि नगरसेवकांच्या कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा रंगली होती. पक्ष प्रवेशाची तयारी सुद्धा झाली. मात्र ऐनेवेळी काही नगरसेवकांनी शिवसेनेशी निष्ठा कायम राखली. 

28 सदस्यीय या पालिकेत शिवसेनेचे 17 नगरसेवक आहे. पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी नवा गट स्थापन करण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी दोन तृतांश नगरसेवकांची गरज होती. परंतु संख्याबळ कमी पडले. शिवसेनेच्या नगरसेवकांची जुळवाजुळव करण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. परंतु त्यात यश आले. नाही.त्यामुळे अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी पक्षप्रवेशाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला, अशी चर्चा आहे. दुसरीकडे भद्रावती पालिकेतील भाजपच्या चार पैकी तीन नगरसेवकांनी कॉंग्रेसचा हात पकडला.  वरोरा पालिकेतील शिवसेनेचे गटनेते गजानन मेश्राम यांच्यासह शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. वरोरा आणि भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा होता. या दोन्ही बाजार समितीचे सभापती कॉंग्रेसवासी झाले.  पूर्व विदर्भातील एकमेक पालिका शिवसेनेने तुर्तास राखली. 

महत्वाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी गेल्याने सेनेची या मतदार संघात चांगलीच पडझड झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती हाच मतदार संघ शिवसेनेच्या पाठीशी नेहमी उभा राहिला आहे. आता त्याला सुरुंग लावण्याचे काम या मतदार संघातील शिवसेनेचे पहिले आमदार आणि कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केले.  विशेष म्हणजे कॉंग्रेसच्या कार्यक्रमाला भद्रावतीचे शिवसेनेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर आणि काही नगरसेवक पूर्णवेळ उपस्थित होते. 

कॉंग्रेसचा सेनेला हादरा
शिवसेनेच्या ताब्यातील वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू चिकटे आणि भद्रावतीचे  वासुदेव ठाकरे  यांनी संचालकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. वरोरा विधानसभा क्षेत्रातील  वेगवेगळ्या पक्षातील तीसहून अधिक ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी त्यांच्या सदस्यांसह प्रवेश घेतला. भद्रावती नगरपालिकेच्या भाजपच्या तीन नगरसेवक निला ढुमणे, जयश्री दातारकर, प्रतिभा निमकर यांनीही काँग्रेसचा हात पकडला. वरोरा नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते गजानन मेश्राम यांच्यासह शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी 
काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे वरोरा पालिका आता शिवसेना मुक्त झाली. प्रवेश घेणाऱ्या नगरसेवकांत शिवसेनेचे राजू महाजन, सनी गुप्ता, चंद्रकला चीमुरकर, पंकज नाशिककर, राशी चौधरी, राखी काळपांडे यांचा समावेश आहे.

शिवसेना-भाजपच्या शेकडो आजी माजी  पदाधिकाऱ्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. धानोरकर सेनेत असतानाच हे नगरसेवक आणि बाजार समिती ताब्यात घेतल्या होत्या. आता त्यांनी जुन्या सहकाऱ्यांना कॉंग्रेसमध्ये आपल्या सोबत घेतले. त्यामुळे या मतदार संघात सेनेला चांगला हादरा बसला आहे. 

देशाच्या हितासाठी कॉंग्रेसचा पर्याय : सुनील केदार 
सध्या देश कठीण परिस्थितीतून जात आहे. देशाच्या  हितासाठी आता कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी या मेळाव्यात केले. भाजपमुक्त महाराष्ट्राची सुरुवात चंद्रपूर मधून करणार, असा विश्वास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला. तर खासदार धानोरकर म्हणाले शेवटच्या कार्यकर्त्याला नेता बनविण्याची ताकद फक्त कॉंग्रेसमध्येच आहे. त्यामुळे पक्षावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येत वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी कॉंग्रेसवासी झाले. मेळाव्याला प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे आदींनी मार्गदर्शन केले. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देविदास काळे, महासचिव अविनाश वारजुरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  प्रकाश देवतळे, काँग्रेस शहराध्यक्ष रामू तिवारी,  महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा चित्राताई डांगे, महिला शहराध्यक्ष सुनिता अग्रवाल,  काँग्रेसच्या केंद्रीय प्रतिनिधी सुनिता लोढीया,  प्रदेश सचिव संदीप गड्डमवार, प्रदेश महिला सचिव नम्रता ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.