shiv sena has power i will blow up the whole family | Sarkarnama

"बेटा, शिवसेना का पॉवर है.. अख्खी फॅमीली को उडा दूंगा' 

अनिल कांबळे 
मंगळवार, 30 जून 2020

सावकाराला 15 लाखांची खंडणी मागून 5 लाख रूपयांची खंडणी वसुली करणारा शिवसेना युवासेनेचा खंडणीबाज अध्यक्ष विक्रम राठोड सध्या पोलिसांच्या भीतीपोटी फरार झाला आहे. तर त्याचा लहान भाऊ शिवसेनेचा शहर कार्याध्यक्ष संजोग राठोड याला अजनी पोलिसांनी चार दिवसांपूर्वीच बेड्या ठोकल्या.

नागपूर : गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याला पक्षात पुन्हा नियुक्ती करण्यासाठी खंडणी मागितल्याच्या प्रकरणात शिवसेनेचा शहरप्रमुख मंगेश कडव चर्चेत आला होता. आज त्याच्यावर पोलीसांनी खंडणीचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. आता त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. मंगेश कडव याने देवा शिर्के यांना 20 लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास "बेटा, शिवसेना का पॉवर हैं...अख्खी फॅमिली को उडा दूंगा' अशी धमकी शिर्के यांना दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे खंडणीसाठी एखाद्याच्या जीवावरही उठण्याची मंगेशची तयारी होती, अशी चर्चा आहे. 

सध्या शिवसेना पक्षातील काही नेते पोलिसांच्या रडारवर आले असून आतापर्यंत मोठमोठ्या तीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खंडणी वसुलीत प्रथम क्रमांकावर असलेला शिवसेनेचा शहर प्रमुख मंगेश कडव हा पोलिसांच्या टार्गेटवर आला आहे. त्याच्यावर नागपूर पोलिसांनी सलग दोन खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत. मंगेशला कोणत्याही क्षणी नागपूर पोलिस अटक करू शकतात. शिवसेनेचा शहरप्रमुख मंगेश कडव याच्याविरूद्ध अंबाझरी आणि सक्‍करदरा पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर बजाजनगर पोलिस ठाण्यात लवकरच मंगेश कडवच्याविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लाभे यांनी भरत नगरातील पुराणीक लेआउटमध्ये घर विकत घेतले होते. सन 2012 पासून ते हैद्राबादमध्ये स्थायिक झाले. त्यांचे बंद असलेले घर शिवसेनेचा शहरप्रमुख मंगेश कडव आणि पक्षातील त्याच्या काही साथीदारांनी हडपण्याचा कट रचला. 2019 ते जून 2020 पर्यंत मंगेश कडव याने बंद घराचे कुलूप तोडून घरातील टिव्ही, फ्रिज, भांडी, सोन्याचे दागिने आणि रोख 45 हजार रूपये, असा एकूण पाच लाख रूपयांचा मुद्‌देमाल लंपास केला. 

त्यानंतर घरावर अवैधरित्या कब्जा केला. ही बाब विक्रम लाभे यांना कळताच त्यांनी मंगेश कडव यांच्याशी संपर्क केला. त्याने लाभे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. घरावरील ताबा सोडण्यासाठी दीड कोटी रूपयांची खंडणी मागितली. मंगेश कडव यांची गुंडगिरी लक्षात येताच लाभे यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात चोरी, खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत तक्रार दिली. अंबाझरी पोलिसांनी लगेच मंगेश कडववर खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट क्र. 1 चे प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुस्ताक शेख करीत आहेत. 

देवा शिर्केलाही मागितली खंडणी 

दुसऱ्या एका प्रकरणात सक्करदरा पोलिसांनीही अभ्यंकर नगरमधील डोंगरे लेआऊट परीसरात राहणाऱ्या मंगेश कडववर फसवणूक, खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. देवानंद बाबासाहेब शिर्के यांनी एक दुकान विकत घेण्याचा सौदा मंगेश कडव याच्याशी 18 लाख रुपयांत केला. रोख व काही रकम धनादेशाद्वारे दिली. उर्वरीत 3 लाख 50 हजार रुपये रजिस्ट्रीदरम्यान देण्याचे ठरले. मात्र मंगेश कडव हा टाळाटाळ करु लागला. चौकशी केली असता सदर दुकान बॅंकेत गहाण ठेवून 50 लाख रुपयांची उचल करण्यात आल्याचे निदर्शनास आले. उलट आरोपीने पैसे परत न करता 20 लाख रुपये खंडणीची मागणी केली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेवटी देवा शिर्के यांनी सक्करदरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. 

युवासेनेचा खंडणीबाज अध्यक्ष अजुनही फरार

सावकाराला 15 लाखांची खंडणी मागून 5 लाख रूपयांची खंडणी वसुली करणारा शिवसेना युवासेनेचा खंडणीबाज अध्यक्ष विक्रम राठोड सध्या पोलिसांच्या भीतीपोटी फरार झाला आहे. तर त्याचा लहान भाऊ शिवसेनेचा शहर कार्याध्यक्ष संजोग राठोड याला अजनी पोलिसांनी चार दिवसांपूर्वीच बेड्या ठोकल्या. शिवसेनेचा संजोग राठोड सध्या अजनी पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख