बेशरमपणाचा कळस झाला, आता सरकारला शॉक द्यावाच लागेल... - shameless self promotion for ballistic products and a great bargain on a neat little knife for you | Politics Marathi News - Sarkarnama

बेशरमपणाचा कळस झाला, आता सरकारला शॉक द्यावाच लागेल...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

आधी वीजबिलात सवलतीचे आश्वासन देणाऱ्या या सरकारचा खोटा चेहरा अखेर जनतेसमोर आला आहे.  सरकारच्या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल आणि या सरकारला वीज बिलामध्ये सवलत द्यायला भाग पाडेल

मुंबई : कोरोना काळातील वाढीव बिलांमध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीसमोर येणार आहे, असे सांगून आता अशी सवलत नाकारणाऱ्या राज्याच्या उर्जामंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. आधी सवलत देऊ, असे सांगून नंतर ती सवलत नाकारण्याची उर्जामंत्री नितीन राऊत यांची कृती म्हणजे निव्वळ बेशरमपणाच नसून खोटारडेपणाचा कळस आहे. या बेशरम सरकारलाच विजेचा शॉक देण्याची गरज आहे, अशी घणाघाती टीकाही भातखळकर यांनी केली आहे. 

भरमसाठ रकमेच्या वीज बिलांविरोधात भाजपने आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देऊ, असे सरकारने जाहीर केले. तसा प्रस्ताव तयार असून अर्थ खात्याबरोबर बैठक झाल्याचेही उर्जामंत्र्यांनी संगितले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुढच्या आठवड्यात प्रस्ताव आणला जाईल, असे जाहीर करून आज त्यांनी घुमजाव केले. त्यामुळे विधानसभेच्या आगामी अधिवेशनात ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणला जाईल, असे भातखळकर म्हणाले. 

ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही व वीज बिल भरले नसल्यास तात्काळ वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. "वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही" हे ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे केवळ बेशरमपणा नसून खोटारडेपणाचा कळस आहे. राज्यातील एका एसटी कर्मचार्‍याने आत्महत्या केल्यानंतर या सरकारला जाग आली, असे अजून किती जीव हे सरकार घेणार आहे? त्यामुळे आता या बेशरम सरकारलाच विजेचा शॉक देण्याची आवश्यकता आहे, अशी टीका देखील भातखळकर यांनी केली आहे. 

आधी वीजबिलात सवलतीचे आश्वासन देणाऱ्या या सरकारचा खोटा चेहरा अखेर जनतेसमोर आला आहे.  सरकारच्या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल आणि या सरकारला वीज बिलामध्ये सवलत द्यायला भाग पाडेल, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख