बाळुभाऊसाठी त्या सात महिला सदस्यांनी सरपंच पदावर पाणी सोडले.. - seven women members left the post of Sarpanch in Chandrapur districts Village news | Politics Marathi News - Sarkarnama

बाळुभाऊसाठी त्या सात महिला सदस्यांनी सरपंच पदावर पाणी सोडले..

श्रीकृष्ण गोरे/ आनंद चलाख
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

सरपंच पदाच्या आरक्षणावार नाराजी व्यक्त करत पाचशे महिला- पुरुषांनी तहसिलवर धडक देत आरक्षण बदलण्याची मागणी केली. परंतु प्रशासनाकडून काहीच बदल झाला नाही.

चंद्रपूर ः निवडणूक म्हणजे घोडेबाजार, वारेमाप पैशाची उधळपट्टी असे समीकरणच झाले आहे. सत्तेसाठी वाटेल ते करण्याच्या स्पर्धेत ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत सात महिलांनी चक्क पाणी सोडले. आदर्श गाव हिवरेबाजर पॅटर्न राबवत त्यांनी उपसरपेच व समाजसेवक यांच्यावर विश्वास दाखवत सरंपच पदासाठी अर्जच भरले नाही.

राजुरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावलौकीक असलेल्या चुनाळा ग्रामपंचायत येथील आज झालेल्या सरपंच,उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सदस्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला. तेरा सदस्यांपैकी निवडून आलेल्या सात महिलांनी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच व समाजसेवक बाळनाथ वडस्कर उर्फ "बाळूभाऊ" यांच्यावर विश्वास दाखवला.

सरपंच पदाकरिता एकाही महिलेने अर्ज भरले नाही. त्यामुळे सरपंच पदावर बाळनाथ वडस्कर यांची बिनविरोध निवड झाली. हिवरे बाजारचा आदर्श डोळ्या समोर ठेवत येथील निवडून आलेल्या महिला सदस्यांनी गावचा कारभार बाळनाथ वडस्कर यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील या एकमेव घटनेची चर्चा आहे.

चुनाळा येथील जनतेनी या निवडणुकीत माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळनाथ वडस्कर यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली. गावकऱ्यांनी एकतर्फी कौल देत सर्व १३ उमेदवार निवडून दिले. आम्हाला "बाळूभाऊ" हाच सरपंच पदी पाहिजे,असा आग्रह सदस्यांनी  धरला. मात्र सरपंच पदाचे आरक्षण हे महिला राखीव निघाल्याने काय करावे असा पेच सर्वाच्या समोर होता. सरपंच पदाच्या आरक्षणावार नाराजी व्यक्त करत पाचशे महिला- पुरुषांनी तहसिलवर धडक देत आरक्षण बदलण्याची मागणी केली.

परंतु प्रशासनाकडून काहीच बदल न झाल्याने निवडून आलेल्या सात महिला सदस्यांनी सरपंच पदासाठी अर्जच दाखल न करण्याचा निर्णय घेतला. गावातील नागरिकांनी देखील  त्यांच्या या निर्णयाला सहमती दर्शवली. अखेर बाळुभाऊ यांची सरपंच पदी निवड झाली आणि चुनाळावासीयांनी एकच जल्लोष केला. 

स्वतःचे विश्रामगृह असणारी ग्रामपंचायत..

चुनाळा गावात ग्रामपंचायतीच्या मालकीचे स्वतःचे विश्रामगृह असून सात एकरच्या परिसरात सागवान वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.  ग्रामपंचायतीचे पहिले सचिवालय तयार करून गावातील सर्व कार्यालये पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, बँक, ग्रामपंचायत त्या इमारतीत आणण्यात आल्या आहेत. स्वतंत्र सभागृह असून गावातील सामाजिक कार्यक्रम व वैक्तिक कार्यक्रम इथे घेतले जातात. 

गावात पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी तीन पाण्याच्या टाक्या, शेतात जाण्यासाठी पांदन रस्त्याची सुविधा असून याच विकास कामावर विश्वास ठेवीत काम करण्याऱ्या माणसालाच सरपंच पदी रुजू करण्याचा निर्णय जनतेनी घेतला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख