says, corona spreads through hardware stores | Sarkarnama

"म्हणे, हार्डवेअरच्या दुकानांतून पसरतो कोरोना !' 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

इतवारी या विदर्भातील सर्वांत मोठ्या बाजारपेठेतील हार्डवेअर दुकानदारांत संताप व्यक्त केला जात आहे. इतवारीतील किराणा दुकानांना परवानगी असताना किराणा ओळीमागेच असलेल्या हार्डवेअरच्या दुकानांना परवानगी नाही आणि त्याचे कारण कुणी सांगत नाही

नागपूर : विदर्भातील सर्वात मोठी असलेल्या इतवारी बाजारपेठेत किराणा दुकानांना परवानगी देण्यात आली. मात्र, याच किराणा ओळीमागील हार्डवेअरची दुकाने प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाने बंद करण्यात आली आहेत. हार्डवेअरच्या दुकानांमुळे कोरोना पसरतो, हा प्रशासनाचा तर्क अनाकलनीय आहे. एकाच भागातील दुकानांबाबत भेदभाव केला जात असल्याबाबत हार्डवेअर डिलर्स असोसिएशनने संताप व्यक्त केला. 

सतरंजीपुरा येथे कोरोनाबाधित मोठ्या संख्येने आढळले. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, या परिसरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या इतवारीतील किराणा दुकानांना परवानगी देण्यात आली. किराणा दुकाने पूर्वीपासून निश्‍चित वेळेसाठी खुली करण्याची परवानगी आहे. परंतु, राज्य सरकारने शहराचा समावेश रेड झोनबाहेर केल्याने हार्डवेअर व्यावसायिकांसोबत इतर दुकानदारांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या. 

मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य सरकारला शहर रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती केली होती. राज्य सरकारने नवे आदेश काढून नागपूरचा रेड झोनमध्ये समावेश केला. त्यामुळे इतर दुकानदारांना चांगलाच धक्का बसला. विशेषतः इतवारी या विदर्भातील सर्वांत मोठ्या बाजारपेठेतील हार्डवेअर दुकानदारांत संताप व्यक्त केला जात आहे. इतवारीतील किराणा दुकानांना परवानगी असताना किराणा ओळीमागेच असलेल्या हार्डवेअरच्या दुकानांना परवानगी नाही आणि त्याचे कारण कुणी सांगत नाही, अशी तक्रार आहे. 

सतरंजीपुऱ्यातील कोरोनाबाधित परिसरापासून हे क्षेत्र एक किलोमीटर दूर आहे. येथील दुकानांना परवानगी नाही, तर दुसऱ्या बाजूने लकडगंज झोनअंतर्गत सुनील होटल आणि भंडारा रोडवरील काही दुकाने सुरू आहेत. ही दुकानेही कोरोनाबाधितांच्या परिसरापासून एक किलोमीटर अंतरावर आहेत. कोरोनाबाधितांच्या परिसरापासून सारख्याच अंतरावर असलेल्या सतरंजीपुरा व लकडगंज झोनमधील दुकानांबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप हार्डवेअर डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन गुप्ता यांनी केला आहे. सेंट्रल एव्हेन्यूवरील मोमिनपुरा परिसराला लागून असलेली दुकाने सुरू आहेत. गांजाखेत येथील विद्युत साहित्याची दुकानेही सुरू आहेत. कोरोना काय फक्त इतवारीतील हार्डवेअरच्या दुकानांतूनच पसरतो काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला. 

व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे धोरण 
काही अटींवर बांधकाम करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम करताना फावडे, कुदळ आणि इतर साहित्य आवश्‍यक आहे. हार्डवेअरची दुकाने बंद असतील तर बांधकाम करणारे कसे काम करणार? बांधकामासाठी हार्डवेअरच्या दुकानांचे विशेष महत्त्व आहे. केवळ एका भागासाठी झोनमधील दुकाने बंद करून व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे धोरण योग्य नाही. 
- मुरलीधर गुप्ता, 
अध्यक्ष, हार्डवेअर डीलर्स असोसिएशन. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख