‘या’ गावाचे सरपंच म्हणतात, माझे गाव चोरीला गेले…

अहेरअल्ली नवीन गावठाणाचे दस्तावेज मिळत नाही, म्हणून आम्ही तक्रार दिली होती. पण तहसील कार्यालयाच्या बहाद्दर बाबू लोकांनी ती तक्रारच गहाळ करून टाकली.
Chotu Raut
Chotu Raut

नागपूर : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे गावकऱ्यांनी गाव विकायला काढल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात यापूर्वी घडली आहे. पण गाव चोरीला गेले, असा प्रकार घडल्याचे मात्र ऐकिवात नाही. पण यवतमाळ जिल्ह्याच्या झरीजामणी तालुक्यातील अहेरअल्ली हे गाव चोरीला गेले आहे. विश्‍वास बसणार नाही, पण खुद्द सरपंचांनीच अहेरअल्ली नवीन गावठाण चोरीला गेल्याची बाब सांगितले आहे. The sarpanch of this village says my village was stolen-am74

अहेरअल्लीचे सरपंच छोटू ऊर्फ हितेश सुधाकरराव राऊत यांनी अहेरअल्ली नवीन गावठाण चोरीला गेल्याची बाब निदर्शनास आणून दिली. राऊत म्हणाले, ८ मार्च २०२१ ला आम्ही तहसील कार्यालयासोबत पत्रव्यवहार केला. त्यामध्ये गाव नकाशा आणि इतर माहिती कार्यालयाला मागितली. पण तहसील कार्यालयाकडे अहेरअल्ली नवीन गावठाणाची कोणतीच माहिती उपलब्ध नाही. वारंवार मागणी करूनही आमच्या गावाचे दस्तावेज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सापडलेले नाहीत. तलाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून आम्ही थकलो आहोत. 

शासन दप्तरी आमच्या गावाची नोंदच नाही, त्याचा एकही कागद नाही. पण नवीन गावठाण आहे. त्याचा नकाशा आणि कुठलाही दस्तावेज नसल्यामुळे आम्हाला पट्टे वाटप करताना आणि इतर कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या योजना राबविताना अडचणी येत आहे, किंबहुना योजनाच राबविता येत नाहीत. सरपंच म्हणून लोक माझ्याकडेच येतात आणि अमुक-तमुक योजनेत आम्ही बसत नाही का, असे प्रश्‍न करतात. तेव्हा निरुत्तर व्हावे लागते. तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी येवढे बेफिकिरीने वागतात, की आज आमच्यावर गाव चोरीला गेले, अशी ओरड करण्याची वेळ आली असल्याचे सरपंच हितेश राऊत म्हणाले. 

आमची तक्रारही हरवली..
अहेरअल्ली नवीन गावठाणाचे दस्तावेज मिळत नाही, म्हणून आम्ही तक्रार दिली होती. पण तहसील कार्यालयाच्या बहाद्दर बाबू लोकांनी ती तक्रारच गहाळ करून टाकली. आता विचारायला गेलो, तर तुमची तक्रार मिळालीच नाही, असे उत्तर दिले जाते. तहसील कार्यालयाने आमच्या गावाचे दस्तावेज तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आम्हाला आता काही वेगळा उपाय करावा लागेल, असेही सरपंच छोटू राऊत म्हणाले. 

काय म्हटलंय पत्रात? 
अहेरअल्ली येथील नवीन पुनर्वसित शासन मान्यता भूखंड शासनामार्फत पाडण्यात आले होते. परंतु याबाबत कुठलेही आदेश ग्रामपंचायत अभिलेखात प्राप्त नाहीत. दिवसेंदिवस अतिक्रमण प्रकरणे या कार्यालयात प्राप्त होत आहेत. तेव्हा कोणता भूखंड कोणास देण्यात आला, त्याचे अटी व शर्ती काय आहेत, भूखंड नकाशा याबाबत सभेत विचारणा करण्यात आली. परंतु याबाबत कुठलेही दस्तावेज कार्यालयात नसल्याने सदस्यांना पुरविण्यात आले नाहीत. आपल्या अधिनस्त कार्यालयातून सदर बाबतीत संपूर्ण दस्तावेज लेखी स्वरूपात पोहोचवण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून भविष्यात प्राप्त अतिक्रमणे या कार्यालयातून निकाली काढणे सोयीचे जाईल व होणाऱ्या अतिक्रमणाला आळा घालता येईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com