संजय राठोड यांचे पुनर्वसन येत्या काही दिवसांत होणार ? - sanjay rathore will be rehabilitated in the next few days | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोड यांचे पुनर्वसन येत्या काही दिवसांत होणार ?

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 मार्च 2021

संजय राठोडांचे पुनर्वसन झाल्यास शिवसेना बंजारा समाजाच्या दबावाला बळी पडली, असाही आरोप होण्याची शक्यता जाणकार वर्तवतात. त्यामुळे राठोडांचे आता करायचे काय, असा यक्ष प्रश्‍न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नक्कीच पडला असेल. येत्या काहीच दिवसांत संजय राठोड आणि मंत्रिपद ही चर्चा सुरू होईल.

नागपूर : बीड जिल्ह्याच्या परळी येथील तरुणी पुजा चव्हाणचा ७ फेब्रुवारीला पुण्याच्या वानवाडी परिसरात मृत्यू झाला. या घटनेला माजी वनमंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरण्यात आले. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला. आता राठोडांचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

पुजा चव्हाणच्या मृत्यूनंतर संजय राठोड एकदम गायब झाले होते. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपांची धार विरोधकांनी तीव्र केली. दरम्यानच्या सुरुवातीच्या काळात प्रकरण थंड होत असल्याची स्थिती निर्माण झाली होती. पण तेवढ्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राठोडांच्या विरोधात जोरदार मोर्चा उघडला. त्यानंतर भाजपच्या महिला आघाडीने राज्यभर विविध आंदोलने करून वातावरण पेटवून दिले. तब्बल १५ दिवसांनंतर राठोड वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे प्रगटले. दरम्यान कोरोनाची स्थिती गंभीर झाली होती आणि त्यांनी पोहरादेवीत जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले. तेथे १५  हजारांपेक्षा जास्त लोकांची गर्दी झाली होती. त्यामुळे सहानुभूती मिळण्याऐवजी समाजातून राठोडांचा जास्तच विरोध होऊ लागला. 

पुजा चव्हाण प्रकरण एकवेळ थंड पडलेही असते, पण पोहरादेवीत शक्तिप्रदर्शन करणे त्यांच्या अंगलट आले, अशा प्रतिक्रिया उमटायला लागल्या. त्यानंतर विरोधी पक्षाने आपली शस्त्रे अधिक पाजवली. विरोधाची धार पाहता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. त्यानंतरही ५ दिवस त्यांनी तो राजीनामा राज्यपालांना पाठवला नव्हता. परिस्थिती काहीच नियंत्रणात येत नसल्याचे बघून अखेरीस त्यांनी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांनी पाचच मिनिटांत तो मंजूर केला. येवढ्या घडामोडींनतरही संजय राठोडांचे पुनर्वसन होईल, असा विश्‍वास त्यांच्या समर्थकांना होता व आजही आहे.

आमदार संजय राठोड यांच्या गोटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पुनर्वसनाच्या हालचाली मुंबईत सुरू झाल्या आहेत आणि येत्या काही दिवसांतच त्यांचे पुनर्वसन होईल. कदाचित ते होईलही. पण, त्यानंतर काय? याबाबत आत्तापासून विविध तर्क लावले जात आहे. काहींच्या मते राज्य सरकारवर ताशेरे ओढले जाण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. आधीच शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आरोप भाजपकडून वारंवार करण्यात येतो. राठोडांचे पुनर्वसन झाल्यास शिवसेना बंजारा समाजाच्या दबावाला बळी पडली, असाही आरोप होण्याची शक्यता जाणकार वर्तवतात. त्यामुळे राठोडांचे आता करायचे काय, असा यक्ष प्रश्‍न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नक्कीच पडला असेल. येत्या काहीच दिवसांत संजय राठोड आणि मंत्रिपद ही चर्चा सुरू होईल, असेही सांगण्यात येते. 

वनखात्याचा कारभार सध्या खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच बघत आहेत. त्या पदाचे स्वीय सहायक आणि अधिकारी, कर्मचारीही कायम आहेत. त्यांच्यात कुठेही बदल करण्यात आला नसल्याची माहिती आहे. त्यामुळेच संजय राठोड पुन्हा मंत्रिपदी विराजमान होतील, असा विश्‍वास त्यांच्या समर्थकांना आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख