महात्मा गांधी-विनोबा भावे युगातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व शांत झाले...

२०१२ पासून ते गीताई केंद्रात वास्तव्याला होते. सर्वधर्म समन्वय हे त्यांच्या कार्याचे प्रमुख सूत्र होते. त्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात दौरे केले. संस्कारशील विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. त्यांना विनोबा भावे व महात्मा गांधी यांचा प्रदीर्घ सहवास लाभला.
Rambhau Mhaskar
Rambhau Mhaskar

पुसद (जि. यवतमाळ) : येथील गीताई केंद्राचे अध्यक्ष व ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते ९६ वर्षीय रामभाऊ म्हसकर यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता निधन झाले. गीताई केंद्राच्या परिसरातच त्यांना समाधी देण्यात आली. त्यांच्या निधनाने गांधी-विनोबा युगातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व शांत झाले. 

रामभाऊ म्हसकर हे मूळ कर्नाटकातील असून १९४५ मध्ये ते सेवाग्राम येथे आले. विनोबा भावे यांचे ते अनुयायी बनले व त्यांनी सर्वोदय चळवळ तसेच भूदान पदयात्रेत सहभाग घेतला. ते काही काळ सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष होते. पवनार आश्रमात ते विश्वस्त होते. पुसद येथील गीताई केंद्राचे ते संस्थापक असून २०१२ पासून ते गीताई केंद्रात वास्तव्याला होते. सर्वधर्म समन्वय हे त्यांच्या कार्याचे प्रमुख सूत्र होते. त्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात दौरे केले. संस्कारशील विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. त्यांना विनोबा भावे व महात्मा गांधी यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. 

विनोबा भावे यांच्या गीताईने ते प्रभावित होऊन गीताईचे प्रचारक बनले. पुसद येथील गीताई केंद्रात सर्व धर्म मंदिर व विनोबा भावे यांचा पुतळा उभारण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्या अंत्यसंस्काराला गीताई केंद्राचे व्यवस्थापकीय विश्वस्त ज्ञानेन्द्र कुशवाह, प्रा. कल्याण साखरकर, पप्पू डोंगरे, वर्धा येथील प्रशांत नागोसे, जालंदर उपस्थित होते. अनेक युवकांचे प्रेरणा स्थान व कार्यकर्त्यांचे आधारवड असलेले रामभाऊ अनेक उपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी कायम जोडलेले असत. त्यांच्या निधनाने सर्वोदयी कार्यकर्ता हरवला, अशी प्रतिक्रिया गीताई केंद्रात उमटली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com