सुरु झाली बारमधील 'दारूगोळ्याची' गोळाबेरीज  - the roundup of liquor in the bar began | Politics Marathi News - Sarkarnama

सुरु झाली बारमधील 'दारूगोळ्याची' गोळाबेरीज 

तुषार अतकरे 
शनिवार, 23 मे 2020

बार मालकांनासुद्घा वाईन शॉपप्रमाणे एमआरपी दराने दारू विक्री करावी लागणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग केला जात आहे. टाळेबंदीच्या काळात अनेक बार चालकांनी अवैधरीत्या दारूची विक्री केली होती.

वणी (जि. यवतमाळ) : कोरोनाच्या संकटामुळे शासनाने देशासह राज्यात लॉकडाउन लागू केले होते. गेल्या दोन महिन्यांपासून मद्यविक्रीवर बंदी होती. आता शासनाने बिअर बार धारकांना सीलबंद दारू विक्रीची मुभा दिली आहे. तत्पूर्वी परमीट रूममधील दारूसाठा तपासण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाला दिले. त्यामुळे बंदी काळात अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. दारूसाठ्यात तफावत आढळल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण राज्यात मद्यविक्री बंद होती. त्यामुळे तळीरामांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. आपली तृष्णा भागविण्याकरिता चक्क हातभट्टीचा आधार घ्यावा लागला होता. तर काहींनी सॅनिटायझरचा वापर नशेकरिता करून आपला जीव गमावला. 11 मे रोजी राज्य शासनाने वाईन शॉप, देशी दारू दुकाने व बिअर शॉपी उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे बिअर बार धारकांनीसुद्घा सीलबंद दारू विकण्याची परवानगी शासनाकडे मागीतली होती. त्यान्वये शासनाने बिअर बारमधून सीलबंद बाटलीतून दारू विक्रीला परवानगी दिली आहे. 

बार मालकांनासुद्घा वाईन शॉपप्रमाणे एमआरपी दराने दारू विक्री करावी लागणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग केला जात आहे. टाळेबंदीच्या काळात अनेक बार चालकांनी अवैधरीत्या दारूची विक्री केली होती. यामुळे वणीतील एका बिअर बारची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र अजूनही अनेक बिअर बार संशयाच्या घेऱ्यात असल्याने वणी तालुक्‍यात असलेल्या 56 बिअर बारमध्ये असलेल्या मद्यसाठ्याची तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केली आहे. यामध्ये तफावत आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे काही बार मालकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. 

एमआरपीनुसारच विक्रीचे निर्देश 
सीलबंद बाटलीतून मद्यविक्रीची परवानगी बार मालकांनी मागितली होती. त्यानुसार बारमधून मद्यविक्रीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मद्यसाठ्याची तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे बारमधून एमआरपीनुसारच विक्री करावी लागणार आहे. 

पितळ उघडे पडण्याची भीती 
लॉकडाउनच्या काळात वणीसह जिल्हाभरातील मद्यविक्रेत्यांनी आपली चांदी करून घेतली. अव्वाच्या सव्वादराने दारूविक्री केली. त्यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारींचा पाऊस पडला. वणीतून चंद्रपूर जिल्ह्यात होणारी दारू तस्करी लपून राहिलेली नाही. या काळात बार मालकांनी बंदी असलेल्या जिल्ह्यातही दारू पुरविली. मद्यसाठ्याच्या तपासणीतून त्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती मद्यविक्रेत्यांना सतावत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख