पोलिसांनी घेतलाय बदला, खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगलात ५ नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान… - revenge taken by police throte batting of five naxalites | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांनी घेतलाय बदला, खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगलात ५ नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान…

संजय तुमराम
मंगळवार, 30 मार्च 2021

चकमक संपल्यावर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य-बंदुका- स्फोटके आणि दैनंदिन साहित्य मिळाले. यात जिवंत काडतुसे, मॅगझीन, ३ प्रेशर बॉम्ब, सुतळी बॉम्ब, सोलर प्लेट, औषध साठा, वायर बंडल आदींचा समावेश आहे. 

चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगल परिसरात पोलिसांच्या नक्षलविरोधी सी-६० पथकाने ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यात मोठे यश म्हणजे गडचिरोली डिव्हिजनचा प्रमुख भास्कर हिचामी याला या पथकाने ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. २०१९ मध्ये कुरखेड्यात केलेल्या भूसुरुंग स्फोटाचा बदला पोलिसांनी यावेळी घेतला आहे.  

पोलिसांनी ठार मारलेल्या पाच नक्षलवाद्यांमध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. २०१९ मध्ये कुरखेडा तालुक्यात जांभूळखेडा येथे झालेल्या भूसुरुंग स्फोटाचा भास्कर हा मास्टरमाइंड होता. या स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. तेव्हापासून भास्कर पोलिसांच्या निशाण्यावर होता. त्याच्यावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर होते. काल त्याचा खात्मा करून पोलिसांनी त्या घटनेची सव्याज परतफेड केली. ठार झालेल्या सर्वांचे मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणले गेले. चकमक संपल्यावर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य-बंदुका- स्फोटके आणि दैनंदिन साहित्य मिळाले. यात जिवंत काडतुसे, मॅगझीन, ३ प्रेशर बॉम्ब, सुतळी बॉम्ब, सोलर प्लेट, औषध साठा, वायर बंडल आदींचा समावेश आहे. 

खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगल परिसरात पोलिसांच्या नक्षलविरोधी सी-६० पथकाने गेल्या ३ दिवसांपासून राबविलेल्या अभियानाचे हे  यश असल्याचे मानले जात आहे. गडचिरोली डिव्हिजनचा प्रमुख भास्कर हा २०१९ पासूनच पोलिसांच्या निशाण्यावर होता. पोलिसांनी यापूर्वी राबविलेल्या अभियानांमध्ये त्याने पोलिसांना चकमा दिला होता. पण २०१९ च्या भूसुरुंग स्फोटाचा बदला घ्यायचाच, असे गडचिरोली पोलिसांनी ठरवले होते. त्यांच्या प्रयत्नांना काल यश आले आणि त्यांनी भास्कर हिचामी याला कंठस्नान घातले. 

पोलिसांना माहिती मिळाही होती की, खोब्रामेंढा जंगल परिसरात काही नक्षलवादी दबा धरून बसले आहेत. ॲडिशनल एसपी मनिष कलवानीया यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिसांच्या सी-६० या पथकाने तेथे गस्त घालणे सुरू केले. दरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. तब्बल दोन तास ती चकमक चालली. चकमक संपल्यानंतर आम्ही जेव्हा परिसराचा तपास केला तेव्हा आम्हाला तेथे पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आणि नक्षली साहित्य आढळले.  
- अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली.

हेही वाचा : मोठी बातमी : लक्षणे नसलेल्या रुग्णांना आता रुग्णालयात 'नो एंट्री'

5 मृत नक्षल्यांची माहिती  - 
१) रुषी रावजी ऊर्फ पवन ऊर्फ भास्कर हिचामी (वय-४६ वर्ष) रा. जवेली (ता. एटापल्ली),  टिपागड एलओएस पदावर कार्यरत होता. याच्यावर एकूण- १५५ गुन्हे दाखल असून यात खुनाचे- ४१ गुन्हे, चकमकीचे – ७८ गुन्हे, दरोडा-०१ विविध जाळपोळीचे- १६ गुन्हे. शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

२) राजू ऊर्फ सुखदेव बुधेसींग नैताम वय-३२, रा. मरकेगाव, टिपागड एलओस उपकंमाडर या पदावर कार्यरत. एकूण- १४ गुन्हे दाखल. यात खुनाचे- ०५, चकमकीचे - ०३, जाळपोळीचे- ०३, दरोडा-०१ व ईतर-०२ गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर एकूण १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

३) अमर मुया कुंजाम (वय-३० वर्ष) रा. जागरगुडा बस्तर एरीया (छ.ग.), पार्टी मेंबर कसनसूर एलओएस या पदावर कार्यरत, याच्यावर एकूण- ११ गुन्हे दाखल असून दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

४) सुजाता ऊर्फ कमला ऊर्फ पुनिता गावडे ऊर्फ आनाम (वय-३८), रा. कापेवंचा, टिपागड एलओएस प्लाटुन क्र. १५ ची पार्टी मेंबर, हिच्यावर एकूण- ३१ गुन्हे दाखल असून तिच्यावर ०४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

५) अस्मिता ऊर्फ सुखलु पदा (वय - २८), रा. गुर्रेकसा, टिपागड एलओएस पार्टी मेंबर, तिच्यावर एकूण- ११ गुन्हे दाखल असून दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख