उत्साहाचा खळाळता झरा म्हणजे, आदरणीय अजित दादा… - respected ajitdada is the sourse of enthusiasm | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

उत्साहाचा खळाळता झरा म्हणजे, आदरणीय अजित दादा…

डॉ. अशोक जिवतोडे एम.कॉम., एम.ए. (अर्थशास्त्र), एम.फिल. एम.एड. पी.एचडी. (शिक्षण, वाणिज्य)
गुरुवार, 22 जुलै 2021

महाविद्यालयीन कामांसाठी तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री मान. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मंत्रालयात गेलो. त्यावेळी आदरणीय अजितदादांनी अतिशय जिव्हाळ्याने माझ्या परिवाराची विचारपूस केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नेहमीच अजितदादांशी भेट व्हायची.

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार राजकारणातील एक आगळं-वेगळं समीकरण आहे. त्यांच्या चुंबकीय व्यक्तिमत्त्वाचा सहवास जिवतोडे कुटुंबीयांकरिता फार जुना आहे. माझे लहान बंधू दिवंगत संजय जिवतोडे यांच्या सोबत आदरणीय अजितदादांशी चंद्रपूर येथे माझी पहिल्यांदा भेट झाली. आदरणीय अजितदादा चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयात आले होते. त्यावेळी मला प्रथमतः:च त्यांच्यातील कामाबाबतचा उत्साह, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, व्यक्तिमत्त्वातील कणखरपणा, वक्तशीरपणा, बाणेदार स्वभाव हे गुण अनुभवता आले. 

त्यानंतर महाविद्यालयीन कामांसाठी तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री मान. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मंत्रालयात गेलो. त्यावेळी आदरणीय अजितदादांनी अतिशय जिव्हाळ्याने माझ्या परिवाराची विचारपूस केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नेहमीच अजितदादांशी भेट व्हायची. प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड आहे. कोणतेही काम त्याचक्षणी मार्गी लावण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. राजकीय व्यक्तींमध्ये दुर्मीळ असलेला स्पष्टवक्तेपणा त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवतो.  

१९६७ ते १९७२ माझे वडील दिवंगत शिक्षण महर्षी श्रीहरी जिवतोडे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत विधानसभेचे आमदार होते. पवार साहेबांनी पुरोगामी लोकशाही दलातर्फे राज्यात सत्ता स्थापन केले. तेव्हा जिवतोडे गुरुजींना फार मोठा आनंद झाला. त्यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर मिठाई वाटप करून पवार साहेबांचे अभिनंदन केले.  तो प्रसंग आजही मला आठवतो. माझे लहान बंधू संजयवर आदरणीय अजितदादांचा विशेष स्नेह होता.  

संजय त्यावेळेला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. चंद्रपूर  जिल्हा परिषद सदस्य होते. त्यावेळी आदरणीय अजितदादांचे संजयला नेहमीच मार्गदर्शन मिळायचे. पवार परिवारांचा हाच स्नेह आणि जिव्हाळ्यामुळे मी राष्ट्रवादी परिवाराचा सदस्य झालो. राज्याच्या राजकारणातील भारदस्त व्यक्तिमत्त्व अजित दादांना वाढदिवसांनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांची राजकीय आणि सामाजिक जीवनात उत्तरोत्तर प्रगती होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांचा परिचय...
ओबीसी समाजजागृती : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून उत्कृष्ट कार्य. दिल्ली, हैद्राबाद, नागपूर व इतर ठिकाणी ओबीसीचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजनात मोठा सहभाग. ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात भव्य मोर्चाचे १६ डिसेंबर २०१८ रोजी आयोजन व यात सर्व जिल्ह्यांतून ओबीसी बंधूभगिनी लाखोंच्या  संख्येने उपस्थित होते. या मोर्चानंतर राज्यात ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली. अनेक ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यात डॉ. अशोक जिवतोडे सर्वात अग्रेसर आहेत. सोबतच विदर्भ विकासाची चळवळ यशस्वीरीत्या चालविण्याचे कार्य डॉ. अशोक जिवतोडे यांचे आहे.

पूर्व विदर्भात शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोचवणारे शिक्षण महर्षी स्वर्गवासी श्रीहरी जिवतोडे गुरुजी यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचे वडील स्व. श्रीहरी बळीरामजी जिवतोडे गुरुजी १९६५ मध्ये चिचपल्ली-दुर्गापूर जिल्हा परिषद क्षेत्रातून सदस्य होते. चंद्रपूर पंचायत समितीचे सभापती राहिले. १९६७ मध्ये राजूरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विठ्ठलराव धोटेंचा चार हजार मतांनी पराभव करीत आमदार झाले होते.

बदलले विदर्भातील राजकारण...
विदर्भातील राजकारणात नुकतीच एक मोठी राजकीय घडामोड झाली. विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज, ओबीसी व विदर्भवादी चळवळीचे नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश मागील आठवड्यात झाला. या सोहळ्याला प्रांताध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांचीदेखील उपस्थिती होती. मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. चंद्रपूर आणि विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे प्रा. डॉ. अशोक जिवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक असलेला एक परिचित मोहरा आपल्यात ओढून घेतल्याचे बोलले जात आहे. विदर्भाच्या विविध जिल्ह्यांत पसरलेल्या शिक्षण संस्था आणि ओबीसी महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर कामाची छाप असलेले डॉ. अशोक जिवतोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला जिल्ह्यात एक दमदार चेहरा मिळाला आहे.

विदर्भात व संपूर्ण देशात ओबीसी चळवळ सक्रिय करून ओबीसींना न्याय देण्याचा व त्यांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकार कडून मंजूर करण्यासाठी देशभरात विविध राज्यांत ओबीसी समाजाची अधिवेशने घेणे, ओबीसीच्या न्याय्य चळवळ व हक्कासाठी वेळोवेळी निर्दर्शने व आंदोलने करणारे विदर्भातील ओबीसी चळवळीचे नेते तथा विदर्भ विकासाची यशस्वी चळवळ चालविणारे डॉ. अशोक जिवतोडे आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांतील ओबीसी समाज पक्षाच्या पाठीशी खंभीरपणे उभा राहणार आहे. सोबतच राष्ट्रवादीची विदर्भातील पोकळी भरून निघणार आहे. 

राज्यात ओबीसीचा नारा पुढे करणारे भाजप सरकार त्यांचे दोन माजी मंत्री असलेल्या चंद्रपुरातून एक कोहिनूर शरद पवारांनी राष्ट्रवादीत खेचून आणल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांनी विदर्भात ओबीसी व विदर्भ चळवळीचा, सामाजिक कार्यात अग्रेसर, सुशिक्षित असलेला चेहरा आपल्याकडे वळविल्याने आता चंद्रपुरातील राजकारण तापले आहे. डॉ. जिवतोडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आत्तापासून २०२४ मधील निवडणुकीची गणिते लावणे सुरू झाले आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख