प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री उपराजधानीत, ‘गोरेवाडा’चे उद्घाटन करणार...

जवळपास 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारण्यात येत असून यामधील महत्त्वाची कामे महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांचेकडून पूर्ण करण्यात आलेली आहेत.
Gorewada Udyan 01- Uddhav Thackeray
Gorewada Udyan 01- Uddhav Thackeray

नागपूर : नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. 

नागपूर जवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत आहे. त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा  उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारीत असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.

भारतीय सफारीचे उद्घाटन
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे वैविध्यपूर्ण असून त्यामधील भारतीय सफारीचे काम पूर्ण झाले आहे. ही सफारी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारी कार्यान्वित करण्यासाठी प्राण्यांचे स्थलांतरण सुद्धा करण्यात आलेले आहे. भारतीय सफारीचे उद्घाटन झाल्यानंतर 40 आसन क्षमतेची 3 विशेष वाहने व ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर उभारणी
जवळपास 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारण्यात येत असून यामधील महत्त्वाची कामे महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांचेकडून पूर्ण करण्यात आलेली आहेत. 

या उद्यानातील सुविधा
नागपूर शहराच्या मध्यापासून गोरेवाडा हे ठिकाण फक्त 6 किलोमीटर असून भविष्यात हे एक महत्वाचे व मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा शासनाचा मानस आहे. हा प्रकल्प नागपूर शहराला लागून असल्याने या प्रकल्पामुळे या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, संशोधन व शिक्षण तसेच वन्यजिवांचे पुनर्वसन, यांबाबतचे कामही या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात केले जाणार आहे. प्राणी उद्यानात ये-जा करणाऱ्या पर्यटकांकरिता पार्किंग, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, वाहने इत्यादी सुविधा करण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही वन मंत्री संजय राठोड यांनी दिली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com