जिल्हा परिषदेची तत्परता; अर्ध्याअधिक गावांमध्ये नाही पोचला कोरोना ! - readiness of zilla parishad corona did not reach more than half of the villages | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

जिल्हा परिषदेची तत्परता; अर्ध्याअधिक गावांमध्ये नाही पोचला कोरोना !

निलेश डोये
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

ग्रामीण भागात कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे सोबत सीईओ योगेश कुंभेजकर यांनी मोठे प्रयत्न केले. गावागावांमध्ये भेटी देऊन प्रत्यक्ष उपाययोजनांची पाहणी करीत मार्गदर्शन केले. त्यातच फलित म्हणून निम्म्यावर गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव रोखता आला.

नागपूर : यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. सुरुवातीला शहरातच असलेल्या या विषाणूने हळूहळू जिल्ह्याच्या खेडे गावांतही पाय पसरायला सुरुवात केली. गावांतील लोकांमध्ये कोरोनाची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. त्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने उपाययोजना करायला सुरुवात केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त गावांमध्ये प्रवेश करण्यापासून कोरोनाला रोखता आले. जिल्ह्यातील १,८६७ गावांपैकी १,३०० वर गावे अजूनपर्यंत तरी कोरोनापासून दूर आहेत. 

मार्च महिन्यात कोरोना शहरात दाखल झाला. त्यानंतर ग्रामीण भागातही पोहोचला. गेल्या तीन महिन्यात त्याने चांगलाच कहर केला. रोज हजारांवर बाधित मिळत होते. तर करणाऱ्यांचा आकडाही ४० पार होता. आता शहरासहित ग्रामीण भागातील बाधितांची संख्या हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आता काही प्रमाणात प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र, तो परत वाढण्याचा इशारा यंत्रणांकडून देण्यात येत आहे. ग्रामीण भागात कामठी, हिंगणा, नागपूर ग्रामीण हे तीन तालुके वगळल्यास प्रादुर्भावाची तीव्रता कमी असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात एकूण ७६८ ग्रामपंचायती असून त्यात एकूण १,८६७ गावे आहेत. यातील ४५७ ग्रामपंचायती आणि ५३९ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

शहरी भागांशी निगडीत तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. तर ३११ ग्रामपंचायती आणि १,३०० गावांमध्ये अद्यापही या विषाणूचा शिरकाव झालेला नाही. यात उमरेड तालुक्यातील सर्वाधिक १६१ गावे आणि त्याखालोखाल कुही तालुक्यातील १५९, काटोल तालुक्यातील १३७ आणि रामटेक तालुक्यातील १२४ गावांचा समावेश आहे. प्रशासनाने सुरुवातीपासूनच कोरोना दक्षता समिती स्थापन केली. अनेक उपाययोजना आखण्यात आल्या. यात आरोग्य विभागाने अहोरात्र मेहनत घेतली. जिल्हा परिषदमध्येच नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. बाहेरून आलेल्यांची नियमित विचारणा करण्यात आली. बाधितांसोबत इतरांची नियमित विचारणा होते. जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविली. सीईओंनी केलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांना यश आल्याचे दिसते. 

सीईओंनी स्वतःपासून दूर ठेवला कोरोना 
ग्रामीण भागात कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे सोबत सीईओ योगेश कुंभेजकर यांनी मोठे प्रयत्न केले. गावागावांमध्ये भेटी देऊन प्रत्यक्ष उपाययोजनांची पाहणी करीत मार्गदर्शन केले. त्यातच फलित म्हणून निम्म्यावर गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव रोखता आला. विशेष म्हणजे काम करताना विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी ठाकरे, तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची बाधा झाली. परंतु सीईओ कुंभेजकर यांनी कोरोनाला आपल्यापासून लांबच ठेवले. त्यामुळे काळजी घेतल्यास कोरोनाला दूर ठेवता येते, हे त्यांनी दाखवून दिले, असेच म्हणता येईल.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख