बिऱ्हाड घेऊन जावे की नाही, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना पडला प्रश्‍न..  - the question fell on the transferred officers whether to take family or not | Politics Marathi News - Sarkarnama

बिऱ्हाड घेऊन जावे की नाही, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना पडला प्रश्‍न.. 

अनिल कांबळे
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

पोलीस महासंचालक हे शिस्तप्रिय आणि वेगवर्धित कामकाजासाठी प्रसिद्ध आहेत. महासंचालकांनी डीपीसी मिटींग घ्यावी आणि पदोन्नतीच्या कार्यकक्षेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची संख्या निश्चित करावी, त्यांचेकडून संवर्ग मागणी करावी तसेच त्यांना लवकरात लवकर पदोन्नती द्यावी.

नागपूर : राज्यातील जवळपास सर्वच पोलिस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांचे कामकाज पूर्ण झाले आहे. प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेले बरेच सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी हे पदोन्नतीच्या कार्यकक्षेत आहेत. त्यामुळे बदली झाली तरी पदोन्नतीमुळे पुन्हा बदली होणार आहे. त्यामुळे बिऱ्हाड घेऊन बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे की नाही, अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस महासंचालक कार्यालयाकडून बहुप्रतीक्षित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना जवळपास पूर्णविराम दिला आहे. या बदल्यांमध्ये विहित प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेले अधिकारी आणि विनंती बदली मागणारे अधिकारी, अशा दोन प्रकारच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्यांचा प्रशासकीय कालावधी पूर्ण झाला आहे, असे अनेक सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी पदोन्नतीच्या कार्यकक्षेत आहेत. त्यामुळे बरेच अधिकारी पोलिस निरीक्षक आणि सहायक निरीक्षक पदावर पदोन्नत होतील. 

ही प्रक्रीया जवळपास एक ते दीड महिन्याच्या कालावधीत होणार आहे. परंतु पदोन्नती झाल्यावर त्या अधिकाऱ्यांना आता आहे त्याच युनिटमध्ये ठेवणे शक्य होणार नाही. पदोन्नतीवर संवर्ग पद्धतीने युनिट वाटप केले जाते. ज्या युनिटमध्ये रिक्त पदे आहेत त्या ठिकाणी पदोन्नती वर बदली द्यावी लागणार आहे. म्हणजे प्रशासकीय बदली झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा बदलीच्या प्रक्रीयेस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बदली झालेले परंतु महिन्याभरात पदोन्नतीस पात्र असलेले पोलिस अधिकारी संभ्रमावस्थेत आहेत.

पुन्हा शिफ्टींगची कटकट
सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना बदली झाल्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहारात कुटुंबासह शिफ्ट व्हावे लागेल. त्यांना सर्व बिऱ्हाड घेऊन नव्या शहरात बस्तान बसवावे लागेल. मुलांचे शिक्षण आणि संसाराची नव्या शहरात घडी बसवावी लागेल. पुन्हा एक ते दीड महिन्यात त्यांची पदोन्नतीने बदली होणार आहे. त्यामुळे पुन्हा बिऱ्हाड पाठीवर घेऊन नव्या शहरात बस्तान घेऊन जावे लागणार आहे.

महासंचालकांनी घ्यावी दखल
पोलीस महासंचालक हे शिस्तप्रिय आणि वेगवर्धित कामकाजासाठी प्रसिद्ध आहेत. महासंचालकांनी डीपीसी मिटींग घ्यावी आणि पदोन्नतीच्या कार्यकक्षेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची संख्या निश्चित करावी, त्यांचेकडून संवर्ग मागणी करावी तसेच त्यांना लवकरात लवकर पदोन्नती द्यावी. जेणेकरून पोलिस अधिकाऱ्यांना दोनदा शिफ्टींग करण्याची वेळ येणार नाही.       (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख