मुंढेंच्या रडारवर आता रुग्णांना उपचार नाकारणारी खासगी रुग्णालये 

न्यूमोनिया, दमाच्या उपचारासाठी येणारा रुग्ण कोरोनोचा रुग्ण असू शकतो. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करावे लागणार आहेत. त्यांची तपासणी करावी लागेल. शहरात खासगी रुग्णालयात कोविड-19 संदर्भातील नियमाचे पालन होताना दिसत नाही
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : शहरात काही खासगी रुग्णालयांकडून विविध आजारांच्या उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना कोरोना तपासणी अहवाल मागितला जात असून उपचार नाकारले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. अशी खासगी रुग्णालये मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आहेत. केवळ स्वॅब तपासणी अहवालासाठी उपचार नाकारणे, हा वैद्यकीय नियमाचा भंग आहे. अशा रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईचा इशारा मुंढेंनी दिला. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी रुग्णालयांत गरोदर महिला आणि इतर आजारांच्या रुग्णांवर स्वॅब तपासणी अहवाल आणण्याची सक्ती केली जात आहे. विशेष म्हणजे अनेकांची तपासणी झालेली नाही. त्यामुळे एखाद्याला ताप, खोकला असेल तर त्यांनाही पळवून लावले जाते. या परीस्थितीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून अशा रुग्णालयांना इशारा दिला. शासकीय रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांनाही कोविड-19 निमित्त नियमांचे पालन करावे लागेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. केवळ कोविड हॉस्पिटल नाही, असे म्हणून रुग्णांना उपचार नाकारता येणार नाही. 

न्यूमोनिया, दमाच्या उपचारासाठी येणारा रुग्ण कोरोनोचा रुग्ण असू शकतो. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करावे लागणार आहेत. त्यांची तपासणी करावी लागेल. शहरात खासगी रुग्णालयात कोविड-19 संदर्भातील नियमाचे पालन होताना दिसत नाही, अशी खंत आयुक्तांनी व्यक्त केली. आयएमए तसेच सर्वच प्रकारच्या डॉक्‍टरांनी ही नियमावली वाचावी, असे आवाहन करीत कुठल्याही रुग्णाकडे स्वॅब तपासणी अहवाल नसल्याने त्याला दाखल करून न घेणाऱ्या डॉक्‍टरांवर वैद्यकीय कायदे व साथरोग प्रतिबंधिक कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. या कारवाईस डॉक्‍टरांनी बाध्य करू नये, असेही ते म्हणाले. 

रुग्णांनी तक्रार केल्यास कारवाई 
कुठल्याही रुग्णालयांना स्वॅब घेऊन संबंधित रुग्णाची तपासणी करावी लागेल. स्वॅब घेण्यास कुणीही डॉक्‍टर नकार देऊ शकत नाही. कॅन्सर रुग्ण असेल तर त्याचीही स्वॅब तपासणी रोखू नये, ही बाब चुकीची आहे. डॉक्‍टरांनी उपचार नाकारल्याची तक्रार रुग्णांनी केल्यास हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल, असे मुंढे म्हणाले. 

दररोज 1500 नागरिकांच्या तपासणीची क्षमता 
शहरात सुरुवातीला केवळ मेडिकलमध्येच कोरोनासंदर्भातील तपासणी केली जात होती. शासकीय व खासगी लॅबची क्षमता वाढविण्यात आली. आता शहरात 1314 लॅब आहेत. शहरात दररोज 1500 जणांची तपासणी होऊ शकते, एवढी क्षमता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी पॉझिटिव्ह रुग्ण आल्यास त्यांना दाखल करून घेत उपचार करावे, असेही आयुक्त म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com