प्रवीण दरेकर म्हणाले, हे सरकार तर कायम विरोधकांच्या भूमिकेत...  - pravin darekar said this government is in the role of permanent opposition | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

प्रवीण दरेकर म्हणाले, हे सरकार तर कायम विरोधकांच्या भूमिकेत... 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

आजही नागपुरात कोविड सेंटरवर आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला. भंडारा आगीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी फायर ऑडिटच्या वल्गना केल्या होत्या.  परंतु त्यानंतर अनेक रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटना घडल्या, तरीही सरकार गंभीर नसल्याचे सांगून दरेकरांनी सरकारवर टीका केली.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर जात आहे. कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत, पण राज्य सरकार मात्र विरोधी पक्षात असल्यासारखी फक्त केंद्रावर टीका करीत आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वाढणाऱ्या रुग्णांना लसीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. परंतु राज्यात एकही लस शिल्लक नाही, अशा प्रकारचे खोटे चित्र खुद्द राज्य सरकारकडून उभं केलं जात असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. राज्यात लशी असूनही राज्य सरकार याबद्दल केंद्रावर टीका करीत आहे. सरकारने या दुट्टपी भूमिकेतून बाहेर आलं पाहिजे. तरच कोरोनाला थोपवण्याचं नियोजन सरकारकडून होऊ शकेल आणि वेगाने उपाययोजना होऊ शकतील, असा सल्लाही दरेकर यांनी सरकारला दिला आहे. 

गेल्या वर्षभराच्या काळात राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून आजही बेडस, व्हेंटीलेटर ऑक्सिजन व आयसीयू बेड्स उपलब्ध नाहीत. रेमडेसिव्हरचा तुटवडा आहे. सरकार मात्र केवळ रेमडेसिव्हरवर नियंत्रण आणू, कारवाई करू, अशी वक्तव्ये करीत आहे. राज्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप करण्याचा मास्टर प्लॅन सरकार राबवत असल्याचा घणाघातही दरेकरांनी केला.        

हेही वाचा : रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणारी टोळी पकडली; ८०० चे इंजेक्शन विकत होते ११ व १५ हजार रुपयांना 
 
आजही नागपुरात कोविड सेंटरवर आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला. भंडारा आगीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी फायर ऑडिटच्या वल्गना केल्या होत्या.  परंतु त्यानंतर अनेक रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटना घडल्या, तरीही सरकार गंभीर नसल्याचे सांगून दरेकरांनी सरकारवर टीका केली.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख