नागपूर : पाच जणांपेक्षा अधिक लोक जमवल्यामुळे जमावबंदी कायद्यानुसार, कारवाई करावी, अशी मागणी मेट्रो प्रशासनाने केली आहे. पण ते हे विसरले की, मेट्रो प्रशासनानेच आम्हाला १५० लोकांना मेट्रोमध्ये नेण्याची परवानगी दिली. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी, भ्रष्टाचार दाबण्यासाठी खोटे आरोप जर ते करत असतील आणि यावर जय जवान जय किसान संघटना चूप बसेल, अशी जर कुणाची अपेक्षा असेल, तर ते होणार नाही. रोक सको को रोक लो, असे आव्हान देत जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी मेट्रोची सुरक्षा व्यवस्था बोगस असल्याचा आरोप केला.
प्रशांत पवार म्हणाले, तेथे नाचगाणे झाले, पैसे उडवले, असा जो आरोप करण्यात येत आहे. तो चुकीचा आहे, असा कुठलाही प्रकार तेथे झाला नाही. किन्नर समाजाला त्यांनी जी नावे ठेवली, ते चुकीचे आहे. किन्नर समाजामध्ये रोष पसरला आहे. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी बोलावले होते. मेट्रो प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गैरप्रकार जर तेथे सुरू होते, तर त्यांची सुरक्षा व्यवस्था कुठे केली होती, हजारो कोटी रुपये खर्च करून सीसी टीव्ही कॅमेरे लावले गेले आहेत, त्याचा उपयोग काय, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. नागपूरच्या मेट्रोमध्ये काय काय प्रकार चालतात, हे दाखविण्यासाठी आम्ही प्रतीकात्मक स्वरूपात हा जुगार आणि नाच दाखवला. हे दाखवत असताना आम्हाला कुणीही थांबविले नाही.
मेट्रोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, मात्र हे सर्व कुचकामी आहेत. त्यामुळं मेट्रोची सुरक्षा व्यवस्था किती निकामी आहे, हे स्पष्ट होतं. जर यापेक्षा गंभीर प्रकार मेट्रोमध्ये झाले तर मेट्रो जबाबदार असेल, असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला. जमावबंदीमध्ये पाच पेक्षा अधिक लोक आणल्याची तक्रार आमच्याविरोधात करण्यात आली. मात्र, मेट्रोने वाढदिवसाची परवानगी देताना 150 लोकांची परवानगी कशी दिली, असा सवालही पवार यांनी केलाय. त्यामुळं आता आम्ही मेट्रोची सुरक्षा व्यवस्था बेभरवशाची असल्याची तक्रार पोलिसांत देणार असल्याचंही पवार यांनी आज सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे लोक मेट्रोच्या उद्घाटनासाठी आणणार होते. तेव्हाही सुरक्षा व्यवस्था परिपूर्ण नव्हती. हे जय जवान जय किसान संघटनेने तेव्हा देशातील जनतेच्या लक्षात आणून दिले होते. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी असल्या प्रकारचे उपक्रम केले जातात. पण याचा मानसिक त्रास नागपुरकरांना होत आहे. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून मेट्रोचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहोत. त्यामुळे आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहे. जनतेचे १० हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा झाला आहे आणि केवळ ३ हजार रुपयांत, पैसे वसूल करण्यासाठी मेट्रोचा वापर होत असेल, तर ते आम्हाला मान्य नाही, असे पवार म्हणाले.
नागपूर पोलिस निष्पक्ष तपास करणार
नागपूर पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पोलिस या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करेल आणि सत्य काय ते जनतेसमोर आणेल. आज तर आम्ही प्रतीकात्मक आंदोलन करून मेट्रो भाड्याने घेऊन त्यामध्ये काय काय होऊ शकते, याचा नमुना सादर केला. पण खरोखरच जर मेट्रोमध्ये एखादा अनुचित प्रकार घडला, तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती. २० जानेवारीला हा प्रकार घडला, त्यावेळी जे लोक ‘ऑन ड्युटी’ होते, त्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली आहे.
Edited By : Atul Mehere

