नागपूर : उच्चशिक्षीत युवक अरविंद बन्सोड याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे. तपासात पोलीसांची भूमिका संशयास्पद असल्याचेही कुटुंबियांचे म्हणणे आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. न्यायालयीन लढाईत वंचित बहुजन आघाडी अरविंद बन्सोडच्या कुटुंबियांसोबत असल्याचे ते म्हणाले.
या प्रकरणात आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी आंबेडकरांनी वकिलांशी भेटून चर्चा केली. उच्चशिक्षित अरविंद बनसोड याचा २७ मे रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात येत आहे. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठविला. राज्यभर निषेध करण्यात आला.
सरकारला इशारा देण्यात आल्यानंतर या प्रकरणात कारवाई करीत अटकसत्र सुरू करण्यात आले. आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अरविंद बनसोडचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या आवारातच अरविंदच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची भेट घेऊन चर्चा केली. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी काय प्रयत्न करता येऊ शकतात ते केले जातील, असे आश्वासनही प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
राज्यात मागासवर्गीयांवर हल्ले वाढत असून त्याच्या विरोधात बुधवारी राज्यभर वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हा,तालुका स्तरावर निवेदने देऊन या सरकारचा निषेध करण्यात आला. हे हल्ले थांबले नाहीत आणि सर्व प्रकरणांत योग्य ती कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनांद्वारे दिला असल्याचे वंचितचे राज्य प्रसिद्धीप्रमुख सुरेश नंदिरे यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.