रेती तस्करांनी जाळली पोलिस चौकी, त्यांना पाठिंबा कुणाचा ? - police post set on fire by sand smugglers whose support | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

रेती तस्करांनी जाळली पोलिस चौकी, त्यांना पाठिंबा कुणाचा ?

अभिजित घोरमारे
शुक्रवार, 5 मार्च 2021

रेती तस्करांपासून गावकरी त्रस्त झाले होते. त्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर ही चौकी लावल्याचे नागरिकांनी सांगितले. चौकीत आग लागली तेव्हा नियुक्त असलेले पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेबाबत मात्र पोलिस बोलण्यास नकार देत आहे.

भंडारा : जिल्ह्यातून होणारी रेती तस्करी रोखण्यासाठी उभारण्यात आलेली पोलिस चौकी अज्ञात लोकांकडून आज पहाटे जाळण्यात आली. ती रेती तस्करांनीच जाळली असल्याचा आरोप लगतच्या गावकऱ्यांनी केला. त्यानंतर याचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यांचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी या घटनेवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. 

आमदार डॉ. फुके म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील खमारा-बेलगाव फाट्यावरील पोलिस चौकी रेती तस्करांनी जाळून खाक केली. ही घटना कारधा पोलिस ठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावर, तर जिल्हा पोलिस मुख्यालयापासून ५ ते ६ किलोमीटरच्या अंतरावर घडली. रेती तस्करांची हिंमत इतकी वाढली आहे की, त्यांनी पोलिस चौकीच जाळून टाकली. ही बाब अतिशय गंभीर असून रेती तस्करांना कुणाचा पाठिंबा मिळत आहे, याची चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कठोर कारवाई करणे आवश्‍यक आहे. 

चौकीला आग लावण्यात आली तेव्हा चौकीत कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. रेती तस्करांचे हे कृत्य असल्याची चर्चा होत आहे. तरीही पोलिसांनी यावर काहीही बोलणे टाळले. पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही तासांतच नवीन चौकी तयार करीत घटना घडलीच नाही, असे भासविण्यास सुरुवात केली आहे. ही पोलिस चौकी कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने कारधा पोलिसांच्या कार्य प्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे.

रात्री चौकीत पोलिस कर्मचारी नव्हते, त्यामुळे जीव हानी झाली नसली तरी चौकीची मात्र जळून राख झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील रेती चोरीचा मुद्दा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांत चर्चेचा झाला आहे. परवाच भंडारा-गोंदिया क्षेत्राचे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत आक्रमकपणे मांडला होता. विधानसभेच्या दोन आमदारांनी या मुद्यावर पायऱ्यांवर आंदोलनही केले. अशा परिस्थितीत ही घटना घडणे म्हणजे रेती तस्कर अधिक मुजोर झालेत का, असा प्रश्‍न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

रेती तस्करांपासून गावकरी त्रस्त झाले होते. त्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर ही चौकी लावल्याचे नागरिकांनी सांगितले. चौकीत आग लागली तेव्हा नियुक्त असलेले पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेबाबत मात्र पोलिस बोलण्यास नकार देत आहे. त्यामुळे घटना होणार होती, हे पोलिसांना माहिती होते आणि पोलिसांचे तस्करांना संरक्षण आहे का, असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. पोलिस कर्मचारी दिवसा चौकीत असतात, ते आम्हाला येता-जाताना दिसतात. पण ते रात्री राहत नाहीत.

रेती तस्कर दररोज दिवसा आणि रात्री नदीपात्रातून शेकडो ट्रक रेती चोरी करतात. त्यांना पोलिसांचे संरक्षण आहे की काय, असे आम्हाला वाटू लागले आहे. या प्रकाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याचा आमचा आरोप आहे. रोज १५० ते २०० ट्रॅक्टर या रोडवर चालतात. तरीही कारवाई केली जात नाही. वनविभागाच्या परिसरातून ही वाहतूक होते. त्यामुळे वनविभागही यामध्ये सामील आहे की काय, अशी शंका असल्याचे बेलगाव मांडवीचे रहीवासी ज्ञानदेव सुदाम टेभूर्णे यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख