पोलिस अधिकारी झाले ‘घर के ना घाट के’, दिवाळी गेली अंधारात… - police officers become ghar ke na ghat ke diwali is in the dark | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस अधिकारी झाले ‘घर के ना घाट के’, दिवाळी गेली अंधारात…

अनिल कांबळे 
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

पोलिस दलातील बदल्यांमध्ये यावेळी राजकिय हस्तक्षेप झाल्याचा आरोप आहे. आपल्या मतदार संघात ‘हाच’ अधिकारी हवा, असा हट्ट आमदार, खासदार आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्ती करतात. तसेच काही अधिकारी ‘सेटींग’ लावून आपली बदली हव्या त्या ठिकाणी करून घेतात. त्यामुळे आस्थापनेत अतिरिक्त पोलिस अधिकारी झाले असल्याचेही सांगण्यात येते. 

नागपूर : नुकताच राज्य पोलिस दलात पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या. मात्र पोलिस महासंचालक कार्यालयाने केलेल्या घोडचुकीचा फटका अनेक पोलिस निरीक्षकांना बसला. अनेक पोलिस अधिकारी बदली झालेल्या ठिकाणी अतिरिक्त ठरले आहेत. त्यांना सध्या विनावेतन काम करावे लागत असल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरातील प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेले आणि विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात. परंतु, या बदल्यांमध्ये पोलिस महासंचालक कार्यलयात मोठा घोळ झाला असून ‘ॲप्रोच’ करणाऱ्या अधिकाऱ्यांना क्रीम पोस्टींग देण्यात आल्या तर प्रशासकीय बदल्या केल्यानंतर अनेक पोलिस निरीक्षक अतिरिक्त ठरले आहेत. ते अधिकारी आमद देण्यासाठी हजर झाल्यानंतर त्यांना तेथील वरिष्ठांनी अतिरिक्त झाल्याचे सांगून रूजू करून घेण्यास नकार दिल्याचे कळते. त्यामुळे अतिरिक्त अधिकारी केवळ पोलिस अधीक्षक कार्यालयात जातात आणि तेथे सायंकाळपर्यंत टाईमपास करून घरी परत येतात. त्यांना पूर्वीच्या घटकातून पदमुक्त केल्यामुळे तेथून वेतन मिळत नाही तसेच नव्या ठिकाणी रूजू करून न घेतल्यामुळे तेथूनही वेतन मिळत नाही. त्यामुळे अतिरिक्त पोलिस निरीक्षकांना पगार नसल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. 

महासंचालक कार्यालयात घोळ 
राज्यभरातील पोलिस निरीक्षकांनी बदलीसाठी तीन संवर्ग दिले होते. परंतु तिनही ऑप्शनमध्ये अनेकांची बदली झाली नाही. पोलिस महासंचालक कार्यालयातील बदल्यांची यादी बनवितांना मंजूर पदे आणि सध्यस्थितीतील पदे याचा ताळलमेळ बसविण्यात आला नाही. तसेच परीक्षेत्रात दहा वर्षे कालावधी पूर्ण झाल्यामुळे पोलिस निरीक्षक बदलीस पात्र ठरतो. त्यामुळे विशेष पोलिस महानिरीक्षकांनीही अशा अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यामुळे आस्थापनेत अधिकारी अतिरिक्त ठरले आहेत. 

राजकिय हस्तक्षेप भोवला 
पोलिस दलातील बदल्यांमध्ये यावेळी राजकिय हस्तक्षेप झाल्याचा आरोप आहे. आपल्या मतदार संघात ‘हाच’ अधिकारी हवा, असा हट्ट आमदार, खासदार आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्ती करतात. तसेच काही अधिकारी ‘सेटींग’ लावून आपली बदली हव्या त्या ठिकाणी करून घेतात. त्यामुळे आस्थापनेत अतिरिक्त पोलिस अधिकारी झाले असल्याचेही सांगण्यात येते. 

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख