एटापल्लीच्या जंगलात पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले

नक्षलवाद्यांमधील विनय नरोटे हा एलओएसचा सदस्य होता. त्याच्यावर विविध कलमांअंतर्गत खून, जाळपोळ व चकमकीचे १६ गुन्हे दाखल होते.
Police Action Against Nakshlist Gadchiroli News
Police Action Against Nakshlist Gadchiroli News

गडचिरोली : काही दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्‍यातील गट्टा (जांबिया) पोलिस मदत केंद्रावर हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना अद्दल घडवत पोलिसांनी बुधवार (ता. २८) सकाळी साडेसहा वाजता झालेल्या चकमकीत दोन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.  विनय लालू नरोटे (वय ३१) रा. झारेवाडा, ता. एटापल्ली व विवेक उर्फ सूरज उर्फ मनोहर कानू नरोटे, रा. झाडाटोला ता. धानोरा, अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.

बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या कारवाईबद्दल सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेला गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख यांची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेत घटनेविषयी माहिती देताना पोलिस अधीक्षक गोयल म्हणाले की, गट्टा (जांबिया) पोलिस मदत केंद्राजवळ २१ एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी गोळीबार केला होता. यावेळी सतर्क होऊन पोलिसांनी सावध पवित्रा घेत गोळीबारास प्रत्युत्तर दिले.

रात्रीच्या अंधारात पोलिसांना बाहेर येण्यास प्रवृत्त करून घातपात घडविण्यासाठी नक्षल्यांनी हा गोळीबार केला होता. शिवाय एक बॉम्बसुद्धा पोलिस मदत केंद्रावर फेकला होता. या घटनेनंतरही काही नक्षलवादी याच परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलिस विभागाला मिळाली होती. याच पार्श्‍वभूमीवर पोलिस दलाने परिसरात नक्षलविरोधी शोधमोहीम राबवली. 

एकावर होते दोन लाखांचे बक्षिस

यात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी त्यास प्रत्युत्तर देत या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमधील विनय नरोटे हा एलओएसचा सदस्य होता. त्याच्यावर विविध कलमांअंतर्गत खून, जाळपोळ व चकमकीचे १६ गुन्हे दाखल होते. याच्यावर सरकारने दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. विवेक नरोटे हा एलओएसमध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर खून, चकमक व इतर असे १८ गुन्हे दाखल होते.

विशेष म्हणजे १४ ऑगस्ट २०२० रोजी कोठी येथे पोलिस जवान दुशांत नंदेश्‍वर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. या घटनेत याच विवेक नरोटेचा सहभाग होता. त्याच्यावर सरकारने सहा लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून एक ९ एमएम पिस्टल, एक भरमार, स्फोटक साहित्य व नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले. या यशाबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलिस दलाचे कौतुक केले आहे.

अनेकांचे केले होते खून.

विनय नरोटे व विवेक नरोटे या दोघांनी पोलिस खबरी असल्याचे कारण दाखवत अनेक निष्पाप आदिवासींचे खून केले होते. त्यांनी पोलिस खबरी असल्याच्या कारणावरून कोठी येथील विनोद मडावी, पुरलगोंदी येथील अशोक कुरसामी व बुर्गी येथील उपसरपंच राम तलांडी या सर्वांच्या खुनात या दोघांचा हात होता, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com