पोलिसांना मिळतो रिवॉर्ड, पण रक्कम जाते कुठे? आयुक्तांनी घ्यावा शोध.. - the police get rewards but where does the money go the commissioner should search | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांना मिळतो रिवॉर्ड, पण रक्कम जाते कुठे? आयुक्तांनी घ्यावा शोध..

अनिल कांबळे
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

पोलिस आयुक्तालयात लिपिक वर्गाचे वर्चस्व आहे. कोणतेही काम वेळेवर करीत नाही. त्यांच्या हाताखाली पोलिस अंमलदार काम करीत आहेत. रिवार्ड किंवा पदकाचे प्रस्तावसुद्धा बाबू ‘चिरीमिरी’साठी अडवून ठेवतात, अशी कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज आहे. काही दिवसांवर दिवाळी आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांची बक्षिसाची रक्कम अडकली आहे.

नागपूर : पोलिस विभागात उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्षिस म्हणून रोख रक्कम (रिवॉर्ड) देण्याची घोषणा केली जाते. रिवॉर्ड तर त्यांना मिळतो, पण त्याची रक्कम जाते कुठे, अशा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही रक्कम पोलिसांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे आता पोलिस आयुक्तांनी दखल घेऊन रिवॉर्डची रक्कम अडली कुठे, याचा शोध घ्यावा, अशा मागणी होऊ लागली आहे. 

पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना किचकट गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून ‘रिवॉर्ड’ म्हणून रक्कम देण्यात येते. १०० रुपयांपासून तर थेट १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम कामगिरीनुसार रिवॉर्ड म्हणून घोषित केली जाते. पोलिसांना अनेकवेळा बिकट परिस्थितीचा सामना करावा लागते. अनेकवेळा त्यांना आपला जीव जोखीममध्येही टाकावा लागतो. कर्मचारी मोठ्या शिताफीने व बुद्धीचातुर्याने गुन्हेगारांना पकडून चांगली कामगिरी करतात. या कामाची दखल झोनचे उपायुक्त व पोलिस आयुक्त घेतात. अशा पोलिस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल काही रक्कम रिवॉर्ड म्हणून दिल्या जाते, तशी नोंद पोलिस आयुक्तालयात सर्विस शिटला करण्यात येते. ही नोंद नोकरीत पदोन्नती, मेडल किंवा विभाग स्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी उपयोगी ठरतात. मात्र, रिवॉर्डची नोंद केवळ शीटवर केल्या जाते. त्या बदल्यात मिळणारी बक्षिसाची रक्कम कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचा हिरमोड होतो, काम करण्यात नैराश्य येऊन कर्तव्याप्रती तत्परता संपते. 

वरिष्ठांनी घ्यावी दखल 
अनेक वेळा सहकारी पोलिस कर्मचान्यांना मिळालेला रिवार्ड हा अन्य कर्मचाऱ्यांना चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित करतो. त्यामुळे पोलिस उपायुक्त किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या रिवार्डची रक्कम वेळेवर मिळावी. पोलिस आयुक्तांनी या बाबीला गांभीर्याने घ्यावे, जेणेकरून पोलिस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढेल, तसेच थोडफार का होईना पोलिसांना आर्थिक हातभारसुद्धा लागेल. 

लालफितशाही धोरण 
पोलिस आयुक्तालयात लिपिक वर्गाचे वर्चस्व आहे. कोणतेही काम वेळेवर करीत नाही. त्यांच्या हाताखाली पोलिस अंमलदार काम करीत आहेत. रिवार्ड किंवा पदकाचे प्रस्तावसुद्धा बाबू ‘चिरीमिरी’साठी अडवून ठेवतात, अशी कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज आहे. काही दिवसांवर दिवाळी आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांची बक्षिसाची रक्कम अडकली आहे. जर ती रक्कम दिवाळीपूर्वी मिळाल्यास सण पोलिस दलात आनंदोत्सव साजरा होईल.                  (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख