‘पीएमसी’चे पुनरुज्जीवन होणार, खासदार धानोरकर यांनी उचलला होता मुद्दा !  - pmc will be revived mp dhanorkar had raised the issue | Politics Marathi News - Sarkarnama

‘पीएमसी’चे पुनरुज्जीवन होणार, खासदार धानोरकर यांनी उचलला होता मुद्दा ! 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

खासदार बाळू धानोरकर यांनी पीएमसी बँकेचे गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील का? केंद्रीय अर्थमंत्री याबाबत स्पष्ट उत्तर का देत नाहीत? हे बिल पारित झाल्यावर तरी या गुंतणूकदारांचे मेहनतीचे पैसे परत मिळतील का? असे प्रश्न लोकसभेत पोडतिडकीने मांडले होते.

नागपूर : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह म्हणजेच पीएमसी बँकेला आर्थिक गैरव्यवहारामुळे रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक वर्षाहून अधिक काळ आपल्या अधिपत्याखाली ठेवले होते. आता या बॅंकेच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू केली आहे. कॉंग्रेसचे चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी संसदेत हा मुद्दा उचलून धरला होता. 
 
खासदार धानोरकर यांच्या प्रयत्नांना लगेच यश आले आहे. या बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये धोक्यात आले. याबाबत लोकसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकावर १६ सप्टेंबर २०२० ला चर्चेत सहभागी होताना खासदार बाळू धानोरकर यांनी पीएमसी बँकेचे गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील का? केंद्रीय अर्थमंत्री याबाबत स्पष्ट उत्तर का देत नाहीत? हे बिल पारित झाल्यावर तरी या गुंतणूकदारांचे मेहनतीचे पैसे परत मिळतील का? असे प्रश्न लोकसभेत पोडतिडकीने मांडले होते. आता या पीएमसी बँकेला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. या बँकेचे लवकरच पुनरुजीवन होण्याच्या हालचाली सुरु झाल्याने खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. पीएमसी बँकेच्या प्रशासकांनी ३ नोव्हेंबर २०२० ला बँकेच्या खातेदारांना पत्रे पाठविली असून गत वर्षभरात बँकेच्या पुनर्रचनेसाठी विविध स्तरांवर सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. या प्रकारे संवाद साधला गेल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

पीएमसी बॅंकेच्या संकेतस्थळावर काल प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये बॅंकेच्या पुनर्रचनेसाठी बॅंकेतील गुंतवणुकीकरिता भागभांडवलातील सहभागाकरिता स्वारस्य मागविण्यात येत असल्याचे म्हटले आहे. बॅंकेच्या व्यवस्थापनावर नियंत्रण मिळवू ईच्छिणाऱ्या सुयोग्य भांडवली गुंतवणूकदार अथवा गुंतवणुकदारांचा गट निर्धारित करुन बॅंकेचे पुनरुज्जीवन केले जावे आणि त्यायोगे दैनंदिन कारभार नव्याने सुरू केला जावा, अशा उद्देशाने इरादापत्र मागविण्यात येत आहे, अशी माहिती बॅंकेने दिली आहे. आता गुंतवणुकदारांचा पैसा सुरक्षित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.       (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख