नागपुरात पेट्रोल ९१.८७, गेल्या ९ महिन्यांत १५ रुपयांची वाढ.. - petrol in nagpur is ninety one us eighty seven paise increase of rs fifteen in nine months | Politics Marathi News - Sarkarnama

नागपुरात पेट्रोल ९१.८७, गेल्या ९ महिन्यांत १५ रुपयांची वाढ..

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे.

नागपूर : पेट्रोलचे भाव शंभरी गाठल्याशिवाय सरकार दम घेणार नाही, अशी टिका सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. जनतेचा अंदाज खरा ठरतो की काय, अशी चिन्हे गेल्या काही दिवसांपासून दिसू लागली आहेत. गेल्या दहा महिन्यांत पेट्रोलच्या किमतींमध्ये जवळपास १५ रुपयांची वाढ झालेली आहे. आज नागपुरात पेट्रोलचा भाव ९१.८७ रुपये झाला. 

सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल भावात दर वाढ झाली आहे. पेट्रोल आज २९ पैशांनी वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीचा हा त्रास सर्वसामान्यांना जास्त होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. १ एप्रिल २०२० ला पेट्रोलचे भाव प्रती लीटर ७७.५३ रुपये तर डिझेलचे भाव हे ६६.४२ रुपये इतके होते. याचाच अर्थ गेल्या ९ महिन्यात कोरोना काळात केंद्र शासनाने पेट्रोलचे भाव जवळपास १५ रुपयांनी वाढविले आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. अशा स्थितीत केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलची ज्या पद्धतीने दरवाढ केली आहे, ही क्रूर थट्टाच म्हणावी लागेल.

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ याच गतीने होत राहिल्यास त्याचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असे लोक बोलत आहेत. पेट्रोलसोबतच घरगुती वापराचा गॅस, खायचे तेल यांसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला ले आहेत. त्यामुळे सामान्य जनता हवालदिल झाली आहे. वाढत्या किमतींवर लवकरात लवकर अंकुश न लावल्यास जनभावनांचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, येवढे मात्र निश्‍चित. 
Edited By : Atul Mehere
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख