नागपुरात पॉझिटिव्ह झालेला व्यक्ती हैदराबाद आणि दुबईत झाला निगेटिव्ह - the person who tested positive in nagpur become negative in haidrabad and dubai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

नागपुरात पॉझिटिव्ह झालेला व्यक्ती हैदराबाद आणि दुबईत झाला निगेटिव्ह

सरकारनमा ब्यूरो
गुरुवार, 18 मार्च 2021

नोकरीवर परत जाणाऱ्या किंवा नवीन नोकरी लागलेल्या लोकांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र देण्या करिता सरळ सरळ दहा हजार रुपयाची मागणी केली जाते. ४८ तास आधीचे प्रमाणपत्र लागत असल्याने गरजू लोक नाइलाजाने खाजगी पॅथॉलॉजी लॅबवाल्यांना कोरोना चाचणी निगेटिव्ह येऊनसुद्धा १०००० रुपये देण्यास बाध्य होतात. 

नागपूर : विदेशात नोकरी करणाऱ्या नागपुरातील एका व्यक्तीला दुबईमध्ये परत जायचे होते. त्याने येथील बायो पॅथ लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली, त्याला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर तो हैदराबादमध्ये असताना मेट्रो लॅबने त्याला निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दिले. ते सुद्धा तो हैदराबादमध्ये असताना. पण हैदराबाद विमानतळावर आणि दुबई येथे पोहोचल्यावर तेथेही केलेल्या कोरोना चाचणीमध्ये तो निगेटिव्ह आढळला. त्यामुळे शहरातील लॅब पैसे घेऊन पॉझिटिव्हला निगेटिव्ह आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह करीत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर प्रवक्ते आणि उपाध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

कोरोना नसल्याचे सर्टिफिकेट पाहिजे तर द्या १०००० 
कोरोना महामारीच्या काळात कोण कोणाची कशा प्रकारे अडवणूक करून पैसे उकळेल, याचा नेमच राहिला नाही. नुकतेच काही दिवसाआधी अमरावती शहरात विमा पॉलिसीचा फायदा घेऊन रक्कम उकळण्याकरिता ज्यांना कोरोना नाही, अशाही विमा पॉलिसीधारकांना कोरोना झाला असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र खाजगी पॅथॉलॉजीकडून देण्यात आले असल्याचा प्रकार उघडकीस आला. मग राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर कसे बरे मागे राहणार. असाच काहीसा मात्र थोडा हटके प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. कोरोनाच्या काळात परदेशी राहणारे बरेच नागरिक आपल्या मायदेशी परत आले आणि आता त्यांना परत जायचे आहे. तर काही लोकांना परदेशी नोकरी लागल्याने त्यांना रक्ताच्या चाचण्या करून कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे. ज्यांना परदेशात जायचे आहे ते बिचारे पॅथॉलॉजी लॅब मध्ये जाऊन रक्त चाचण्या करतात आणि परदेशात जायचे असल्याने रिपोर्ट  लवकर देण्याची विनंती करतात आणि ह्याच ठिकाणी सावज हेरले जाते. 

विदेशात जाणार म्हणजे पैसेवाले पार्टी असणार, हे गृहीत धरून या नोकरीवर परत जाणाऱ्या किंवा नवीन नोकरी लागलेल्या लोकांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र देण्या करिता सरळ सरळ दहा हजार रुपयाची मागणी केली जाते. ४८ तास आधीचे प्रमाणपत्र लागत असल्याने गरजू लोक नाइलाजाने खाजगी पॅथॉलॉजी लॅबवाल्यांना कोरोना चाचणी निगेटिव्ह येऊनसुद्धा १०००० रुपये देण्यास बाध्य होत असल्याचा प्रकार नागपुरात घडत आहे. अशाचं एका प्रकरणात शहरातील प्रतिष्ठित दोन कोविड चाचणी केंद्रात बोगस अहवाल देण्यात आला. ११ मार्चला एका इसमाने विदेशात जायचे असल्यामुळे (कुठलेही लक्षण नसताना ) आपल्यासाठी कोविड चाचणीचे सॅम्पल डॉ. दिनेश अग्रवाल यांच्या बायोपॅथ या रामदासपेठेतील नामांकित प्रयोगशाळेला दिले.  ते स्वतः दुबईला जात असल्यामुळे त्याच दिवशी हैद्राबादला निघून गेले. 

दुसऱ्या दिवशी त्यांना दुपारी ते कोरोनाबाधित असल्याचा अहवाल पाठविण्यात आला. वेळेवर अशी माहिती मिळाल्याबरोबर तो इसम आणि त्यांचे सर्व नागपुरातील नातेवाईक घाबरून गेले. याच प्रयोगशाळेमधून एका कर्मचाऱ्याचा त्यांना फोन आला. १०००० रुपये दिल्यास रिपोर्ट दुसरा मिळेल असे सांगण्यात  आले आणि त्यांना त्याच दिवशी दुसऱ्या प्रयोगशाळेचा म्हणजेच मेट्रोलॅब डायग्नोस्टिक सेंटर, धंतोलीचा निगेटिव्ह असल्याचा अहवाल ते हैदराबादला असताना देण्यात आला. दुबईला पोहोचल्यानंतर त्यांच्या तिथल्या चाचण्यांमध्ये कुठलाही संसर्ग आढळला नाही, हे विशेष. अशा प्रकारे संसर्ग नसलेल्या लोकांना संसर्गित दाखवून ICMR आणि महानगरपालिकेला चुकीचे आकडे देणाऱ्या आणि लोकां लुबाडणाऱ्या प्रयोगशाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्रीकांत शिवणकर यांनी आज केली.
 
खाजगी इस्पितळांच्या आणि चाचणी केंद्रातील वाढीव बिलासंबंधी आणि त्यामुळे नागरिकांना होणार त्रास टाळण्यासाठी प्रत्येक कोविड रुग्णालयांच्या बाहेर शासनमान्य दरफलक लावावे, अशी मागणी राष्ट्रवादीकडून २६ ऑक्टोबर २०२० पासून सातत्याने करण्यात येत आहे. परंतु महानगरपालिका या संदर्भात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. लोकांच्या भयभित मानसिकतेचा फायदा घेऊन पैसे उकळण्याचा गोरखधंदा नागपुरात जोरात सुरू असून महानगरपालिकेने जातीने लक्ष देऊन अशा लायक नसलेल्या आरोग्य सेवा संस्थांवर  कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा लुबाडणाऱ्यांना चोप देऊन ठिकाणावर आणले जाईल, अशा इशारा श्रीकांत शिवणकर, उत्तर नागपूरचे अध्यक्ष विशाल खांडेकर, माजी नगरसेवक अशोक काटले आणि मेहबूब पठाण यांनी दिला आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख