‘पॅरिस करारानुसार वीज प्रकल्पाचे प्रदूषण होणार कमी’ - paris agreement will reduce power plant pollution | Politics Marathi News - Sarkarnama

‘पॅरिस करारानुसार वीज प्रकल्पाचे प्रदूषण होणार कमी’

योगेश बरवड
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

राज्यातील वेस्टर्न कोल्ड फिल्ड्स लिमिटेडच्या (डब्लूसीएल) खाणीतील उच्च दर्जाच्या कोळशाची विक्री इतर राज्यांना करण्यात येते. मात्र कमी दर्जाचा कोळसा महानिर्मितीच्या केंद्रांना देण्यात येत असल्याने यातून राख जास्त निर्माण होत आहे. लवकरच सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्राची तपासणी करण्यात येणार असून त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाची माहिती घेतली जाईल.

नागपूर : ऊर्जा प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डॉ. नितीन राऊत यांच्यासोबत काल मुंबईत बैठक घेतली. यावेळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन डॉ. राऊत यांनी दिले. पॅरिस करारानुसार औद्योगिक कारणांमुळे होणारे पर्यावरणातील बदल टाळण्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्राद्वारे होणारे प्रदूषण टाळणे आवश्यक आहे, त्यासाठी उपाययोजना निश्चित करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने धोरण निश्चितीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागाला दिले. 

उत्सर्जित राखेचा वापर रस्ते निर्माण करण्यासाठी व सिमेंट निर्मितीमध्ये करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ व सिमेंट उद्योगांच्या प्रतिनिधींसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. ऊर्जा मंत्रालयासोबत पर्यावरण मंत्रालय सुध्दा यात भाग सहभागी होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. सध्या राज्यातील औष्णिक वीज प्रकल्पात वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाचा दर्जा चांगला नसल्याने यातून मोठ्या प्रमाणावर राख निर्मिती होते. 

राखेची विल्हेवाट लावण्यासाठी जर त्याचा वापर सिमेंट कारखान्यात व रस्ते बांधण्यासाठी केला तर पर्यावरणाचे संवर्धन करता येईल. मात्र, कोराडी व खापरखेडा येथील उत्सर्जित राखेचा वाहतूक खर्च अंदाजे १३५ कोटी रुपये असून सदर खर्च रस्ते विकास महामंडळाने उचलावा अशी अपेक्षा डॉ. राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सिमेंट उद्योगांनी याचा वापर करण्यास प्रोत्साहित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

औष्णिक वीज निर्मिती केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाची तपासणी करण्यात येणार आहे. राज्यातील वेस्टर्न कोल्ड फिल्ड्स लिमिटेडच्या (डब्लूसीएल) खाणीतील उच्च दर्जाच्या कोळशाची विक्री इतर राज्यांना करण्यात येते. मात्र कमी दर्जाचा कोळसा महानिर्मितीच्या केंद्रांना देण्यात येत असल्याने यातून राख जास्त निर्माण होत आहे. लवकरच सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्राची तपासणी करण्यात येणार असून त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाची माहिती घेतली जाईल, अशी माहिती डॉ राऊत यांनी दिली.     (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख