एनसीआयमध्ये शंभर खाटांचे कोविड रुग्णालय सुरू, रेमडिसिव्हिरचा पुरवठा वाढणार... - one hundred covid hospital started in nci supply of remedicivier will increase | Politics Marathi News - Sarkarnama

एनसीआयमध्ये शंभर खाटांचे कोविड रुग्णालय सुरू, रेमडिसिव्हिरचा पुरवठा वाढणार...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

आज कोविड संकटाचा आपण सामना करतो आहोत. पण त्यापेक्षा भीतीचे वातावरण अधिक आहे. त्यामुळे समुपदेशनाची प्रक्रिया हाती घेणे हीसुध्दा काळाची गरज आहे. गरज असेल त्यालाच रुग्णालयात दाखल करणे आणि आवश्यकता असेल तेव्हा, रेमडेसिव्हिरचा वापर यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपुरात १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उदघाटन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर येथे काल करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रुग्णालयाचे उदघाटन केले. येत्या काही दिवसांतच आणखी शंभर खाटा येथे उपलब्ध करण्यात येणार आहेत. 

याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपुरात अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण सारेच प्रयत्न करीत आहोत. नितीन गडकरी यांनीसुध्दा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे येत्या चारपाच दिवसांत स्थिती बऱ्यापैकी सुधारेल. आपण नागपूर महापालिकेतील स्थितीचा सुध्दा आढावा घेतला. पाचशे बेड आणखी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होतो आहे. काल केंद्र सरकारने रेमडिसिव्हिरच्या उत्पादनासाठी अतिरिक्त साईट्सला मंजुरी दिली आहे. 

आज कोविड संकटाचा आपण सामना करतो आहोत. पण त्यापेक्षा भीतीचे वातावरण अधिक आहे. त्यामुळे समुपदेशनाची प्रक्रिया हाती घेणे हीसुध्दा काळाची गरज आहे. गरज असेल त्यालाच रुग्णालयात दाखल करणे आणि आवश्यकता असेल तेव्हा, रेमडेसिव्हिरचा वापर यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. काही सामाजिक संघटना आणि भाजप वैद्यकीय आघाडीच्या मदतीने हे काम हाती घेतले जात आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या एनसीआयमध्ये या सुविधेत २० बेड हे व्हेंटिलेटरसह तर उर्वरित ८० हे ऑक्सिजन बेड्स असल्याचे सांगितले.

रेमडिसिव्हिर तयार करण्यास आणखी ७ कंपन्यांना परवानगी
महाराष्ट्र आणि नागपूर येथील कोरोनाची विदारक स्थिती पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेमडिसिव्हिर इंजेवशनचे उत्पादन वाढविण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री मनसुख भाई मांडवीय यांना केली होती. गडकरी यांची विनंती मान्य करण्यात आली. गडकरी यांच्या प्रयत्नांना यश आले असून रेमडिसिव्हिर या इंजेक्शनची निर्मिती करण्यासाठी आता आणखी ७ कंपन्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री मनसुख भाई मांडवीय यांची आज गडकरींनी दिल्लीत भेट घेतली. 

या इंजेवशनचे उत्पादन आता १० लाख व्हायल प्रतिमहा याप्रमाणे ७ ठिकाणी बनविण्यात येणार आहे. नागपूर शहर आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाची अत्यंत गंभीर स्थिती आहे. नागपुरात कोरोना रुग्णांसाठी गडकरी यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत शहराला ७१५० रेमडिसिव्हिर इंजेक्शन मिळाले आहेत. सात हजार इंजेक्शन आणखी येणार आहेत. 
रेमडिसिव्हिर उत्पादनाचे पेटेंट ४ कंपन्यांकडे आहे. या चार कंपन्या युध्दस्तरावर औषध निर्मिती करीत आहेत. पण आवश्यक तेवढा पुरवठा त्या करू शकत नाही. 

हेही वाचा : अमेरिकी सैनिकांची आता घरी परतण्याची वेळ; जो बायडन यांची मोठी घोषणा

यासाठी पेटेंटचा कायद्यातील कलम ८४ काही काळासाठी शिथिल करण्यासाठ़ी गडकरी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठविले  व आज प्रत्यक्ष पंतप्रधानांची भेट घेतली. हा कायदा शिथिल झाला तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे औषध तयार करणाऱ्या काही कंपन्यांना हे औषध बनविण्याची परवानगी देता येईल, यासाठ़ी गडकरींनी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया यांच्याशीही संपर्क केला होता.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख