संविधान दिनी ओबीसी ताकदीने रस्त्यावर उतरतील : बाळू धानोरकर - obcs will take to the streets on constitution day said balu dhanorkar | Politics Marathi News - Sarkarnama

संविधान दिनी ओबीसी ताकदीने रस्त्यावर उतरतील : बाळू धानोरकर

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे. आजवर या समाजातील महिला कधीच रस्त्यावर उतरल्या नाही. परंतु २६ तारखेला संविधान दिनी रस्त्यावर उतरून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यात त्या आपली शक्ती दाखविणार आहेत.

चंद्रपूर :  देशभरात ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे, हे कळणे अत्‍यावश्यक आहे. १९३३ साली इंग्रजांच्या कार्यकाळात जनगणना झाली होती, तेव्हा फक्‍त एकदाच ओबीसीची जनगणना करण्यात आली होती. तेव्हापासून ओबीसींची जनगणना झालेली नाही. येत्या वर्षी होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजासाठी वेगळा रकाना नाही, तो असायला हवा, यासाठी संविधान दिनी जिल्ह्यातील ओबीसी समाज संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले. 

सन १९३३ मध्ये देशात ५४ टक्के ओबीसी समाज असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. आरक्षण देताना त्‍याच्या अर्धे २७ टक्‍के आरक्षण ओबीसी समाजाला देण्यात आले. मात्र, सध्या देशभरात ओबीसी समाज नेमका किती आहे, याची निश्चित आकडेवारी उपलब्‍ध नाही. केंद्र पातळीवर जितक्‍या समित्‍या नेमण्यात आल्‍या किंवा विविध न्यायालयांत याच्याशी संबंधित जितके विषय आले, त्‍यामध्ये ओबीसी समाजाची आकडेवारी मागण्यात आली आहे. मात्र ती उपलब्‍ध नाही. 

आता सन २०२१मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजासाठी वेगळा रकाना नाही. तो असायला हवा. ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे, अशा इतर मागणीला घेऊन संविधान दिनी २६ तारखेला चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे. त्यावेळी पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. ते वरोरा येथे ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, बळीराज धोटे, दत्ता हजारे, पुरूषोत्तम सातपुते, सूर्यकांत खनके, विजय बदखल, रमेश राजूरकर, नितीन मत्ते यांची उपस्थिती होती. 

आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे. आजवर या समाजातील महिला कधीच रस्त्यावर उतरल्या नाही. परंतु २६ तारखेला संविधान दिनी रस्त्यावर उतरून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यात त्या आपली शक्ती दाखविणार आहेत. संपूर्ण ओबीसी समाजातील महिलांनी ऐतिहासिक मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उद्या दुचाकी रॅली 
ओबीसी स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे याकरिता २६ नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीच्या जनजागृतीसाठी २५ नोव्हेंबर रोजी वरोरा शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. चंद्रपूरमध्ये निघणारी ओबीसी रॅली व उद्या वरोरा शहरातून काढण्यात येणाऱ्या दुचाकी वाहन रॅली संदर्भात खासदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. 

बैठकीत मनसे नेते रमेश राजूरकर, बाजार समिती सभापती राजेश चिकटे, उपसभापती देवानंद मोरे, जि. प. सदस्य सुनंदा जीवतोडे यांची उपस्थिती होती. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता वरोरा - चंद्रपूर मार्गालगतच्या शासकीयविश्रामम गृहाजवळ दुचाकी वाहन रॅली निघणार आहे. वाहन रॅली आनंदवन चौक, रेल्वे स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मत्ते रुग्णालय, नेहरू चौक, चिकन मार्केट, साई मंगल कार्यालय- कामगार चौक, मिलन चौक, फिल्टर टॅंक तुळाना रोड, जुनी पाणी टाकी, माढेळी रोड - खेमराज कुरेकार - राजीव गांधी चौक - बँक ऑफ महाराष्ट्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, डोंगरवार चौक त्यानंतर महात्मा गांधी चौकात समारोप करण्यात येणार आहे. या दुचाकी रॅलीमध्ये पुरुष, महिला, युवक, युवतींनी मोठ्या संख्येने आणि २६ नोव्हेंबरच्या चंद्रपूर रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख