आता मुंढेंना विधानसभेतच पाहीन : आमदार विकास ठाकरे 

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झापल्याचे व्हीडीओ स्वतःच व्हायरल करायचे आणि आपला प्रचार करवून घ्यायचा, असे काम सध्या मुंढे करीत आहेत. ते सरकारचे नोकर आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार म्हणजे सरकार आहे आणि ते सरकारचेच ऐकत नसतील तर काय करायचे अशा अधिकाऱ्याचे?
Vikas Thakre-Tukaram Mundhe
Vikas Thakre-Tukaram Mundhe

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे "पब्लीसीटी क्रेझी' आहेत. त्यांच्या भक्तांकरवी स्वतःच आपले फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन स्वतःला "नागपुरचा राजा' म्हणवून घेतात. महानगरपालिकेत तर नगरसेवकांची किंमतच उरली नाही. "लॉकडाऊन है, अब यहां हवा भी मेरी मर्जी से चलती है', असे म्हणत तुकाराम मुंढे पॅटर्न असल्याचा प्रचार करतात किंवा करवतात. महाविकास आघाडी सरकारचा पॅटर्न असू शकतो, पालकमंत्री पॅटर्न असू शकतो. पण सरकारमधील एका अधिकाऱ्याचा पॅटर्न कसा असू शकतो, असा प्रश्‍न करीत आता मुंढेंना विधानसभेतच पाहीन, असे आमदार विकास ठाकरे म्हणाले. 

आमदार ठाकरे यांनी काल सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, मुंढे यांना आपला वैयक्तिक विरोध नाही. मात्र ते ज्या पद्धतीने वागतात, काम करतात त्याला आहे. मी त्यांच्याकडे स्वतःच्या कामासाठी जात नाही. लोकांच्या तक्रारी आल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जातो. त्या समजून घेण्याऐवजी आपणच कसे बरोबर आहोत, यावरच त्यांचा भर असतो. करोनाचा रुग्ण आढळल्यानंतर ट्रस्ट ले-आऊटसह जवळपास पाच किलोमीटरचा परिसर त्यांनी बंद केला. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी, गैरसोयी जाणून घेतल्या नाही. डॉक्‍टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी यांनाही बाहेर पडू दिले नाही. नियमानुसार लॉकडाऊन करताना तेथील नागरिकांना सोयीसुविधा पुरवाव्या, हा नियम आहे. तो त्यांनी मान्य केला नाही. आता ट्रस्ट ले-आऊट वगळून इतर वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्रातून वगळले. हीच मागणी आपण करीत होतो. आता कोण चुकले हे मुंढे यांनीच सांगावे. 

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झापल्याचे व्हीडीओ स्वतःच व्हायरल करायचे आणि आपला प्रचार करवून घ्यायचा, असे काम सध्या मुंढे करीत आहेत. ते सरकारचे नोकर आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार म्हणजे सरकार आहे आणि ते सरकारचेच ऐकत नसतील तर काय करायचे अशा अधिकाऱ्याचे? हे सर्व असेच जर सुरु राहीले आणि एकच माणूस कुणालाही न जुमानता शहराचा कारभार करणार असेल, तर चालणार नाही. मी नगरसेवक, महापौर राहीलेलो आहे. तळागाळातील लोक त्यांचे प्रश्‍न घेऊन येतात. त्यांची कामे करण्यासाठीच मी आहो. अनेक आयुक्तांसोबत आजपर्यंत काम केले आहे. पण अशी हेकेखोरी कधी पाहीली नाही. असे 10 मुंढे आले तरी चालतील, असे आमदार ठाकरे म्हणाले. 

लोकप्रतिनीधींचे ऐकायचे नाही, जनतेच्या अडचणी समजून घ्यायच्या नाहीत, प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखील लोकांना महिनाभर डांबून ठेवायचे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची नाही आणि भक्तांमार्फत सोशल मीडियावर स्वतःला नागपूरचा राजा म्हणून घ्यायचे असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे धोरण आहे. त्यामुळे असा हेकेखोर राजा आम्हाला नको आहे, याचा हिशेब आपण अधिवेशनात घेऊ असा इशारा आमदार विकास ठाकरे यांनी दिला. 

पब्लिसिटी क्रेझी 
मुंढे पगारी नोकरदार आहे. राज्य सरकारच्या सर्व सोयीसुविधा घेतात. सरकारच्याच योजनांची त्यांना अंमलबजावणी करायची असते. मात्र ते मुंढे पॅटर्न म्हणून स्वतःचा प्रचार करतात. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. याचे श्रेयही ते सरकारला देत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी त्यांची एजंसी नियुक्त केली आहे. यावर त्यांचे भक्त वेगवेगळ्या पोजचे फोटो टाकतात. "नागपूरचा राजा' म्हणतात. यावर त्यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून काधी आक्षेप घेतला नाही. सरकारची नोकरी करतो, असे म्हटले नाही. यावरून सर्वच मुंढेंच्या सहमतीने सुरू असल्याचे स्पष्ट होते. एवढीच प्रसिद्धी आणि समाजसेवेची खुमखुमी असेल तर मुंढे यांनीत नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात यावे, असेही ठाकरे म्हणाले. 

गुन्हे दाखल करण्याच्या धमक्‍या 
कॅंग्रसेच्या एका नगरसेवकाने विलिकरणासाठी दोन तासाची मुदत मागितली होती. मात्र मुंढे यांच्या आदेशावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आपणावरसुद्धा गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. पालकमंत्री, महापौर, आमदारांचेही ते ऐकत नाही. रचना अपार्टमेंट येथील एका इमारतीत त्यांनी क्वारंटाईन सेंटर सुरू केले. याच इमारतीला लागून असलेल्या फ्लॅटमध्ये दीडशे कुटुंब राहातात. त्यांचा विरोध स्वाभाविक होता. मात्र त्यांनाही हाकलून लावले, असे ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com