आता ‘ही’ कामेही आम्हीच करायची का, पोलिसांचा सवाल… - now should we do these work also polices question | Politics Marathi News - Sarkarnama

आता ‘ही’ कामेही आम्हीच करायची का, पोलिसांचा सवाल…

सुनील सरोदे
मंगळवार, 13 एप्रिल 2021

एकाच वेळी चार कोरोना रुग्ण दगावल्यानंतर तेथील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, हे समजू शकते. पण मृतदेह उचलून नेऊन अंतिम संस्कार करेपर्यंतची जबाबदारी पोलिसांची निश्‍चितच नाही, हे कुणाही सांगू शकेल.

कन्हान (जि. नागपूर) : कांद्रीच्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय चिकित्सालयात आज सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतरही स्थानिक प्रशासनात गती आली नाही. लोकांचा उद्रेक वाढत असतानाही कुणीही पुढे आले नाही. कन्हानचे ठाणेदार आणि प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर यांनीच पुढाकार घेऊन चारही मृतदेह तेथून नेले. त्यानंतर ‘आता ही कामेही आम्हीच करायची का’, असा सवाल पोलिसांनी विचारला आहे. 

डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा न झाल्यामुळे चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर तेथे लोकांचा मोठा उद्रेक झाला. काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ठाणेदार सुजीतकुमार क्षीरसागर तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तरीही काही लोक हॉस्पिटलवर चाल करून गेले. एक तर स्थानिक प्रशासन ढिम्म होते. आरोग्य विभागाचे लोकही सुस्तच होते. मृतदेह लवकर तेथून नेले पाहिजे. येवढेही भान कुणाला नव्हते. अखेर ठाणेदार क्षीरसागर यांनीच मृतदेह हॉस्पिटलमधून उचलले आणि अंतिम संस्कार करण्यासाठी रवाना केले. तरीही आरोग्य विभागातील लोक तेथे आले नाहीत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासह ही कामेही आम्हीच करायची का, असा प्रश्‍न साहजिकच पोलिसांच्या मनात आला. क्षीरसागर यांनी तसे बोलुनही दाखवले. 

एकाच वेळी चार कोरोना रुग्ण दगावल्यानंतर तेथील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, हे समजू शकते. पण मृतदेह उचलून नेऊन अंतिम संस्कार करेपर्यंतची जबाबदारी पोलिसांची निश्‍चितच नाही, हे कुणाही सांगू शकेल. तर मग कोठे गेले होते आरोग्य विभागाचे लोक आणि काय करत होते स्थानिक प्रशासन, असे प्रश्‍न आता उपस्थित झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिल्यानंतरही केवळ आणि केवळ गैरव्यवस्थेमुळे चार जण दगावले आहेत. त्यामुळे रुग्णालयांवरही भरवसा करावा की नाही, असा प्रश्‍न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. 

हेही वाचा : मोदी हे अत्यंत बेजबाबदार, बेफिकीर पंतप्रधान..नाना पटोलेंचा हल्लाबोल 

सिलिंडर मुबलक, पण कर्मचारी नाहीत…
कांद्रीच्या जेएन हॉस्पिटलमध्ये ६४ बेड्स आहेत. ऑक्सिजनचे सिलेंडरही मुबलक प्रमाणात आहेत. पण त्याचे व्यवस्थापण करण्यासाठी पुरेसे आरोग्य कर्मचारी नसल्यामुळे आजची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे वेळीच प्रशिक्षित डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली असती, तर कदाचित चौघांचा जीव वाचविता आला असता, असेही काहींचे मत आहे. निदान कोरोना काळात तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने आपले काम करावे, अशी अपेक्षा ग्रामीण भागात व्यक्त केली जात आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख