नवे गृहमंत्री वळसे पाटील यांच्या गृहमंत्री आहेत वऱ्हाडच्या कारंजामधील...

शांत आणी संयमी राजकारणी म्हणून ओळख असलेले दिलीप वळसे पाटील हे वाशीम जिल्ह्याच्या कारंजा येथील डहाके परिवाराचे जावई आहेत. स्वातंत्र्यसेनानी उत्तमराव डहाके व छबूताई डहाके यांच्या कन्या किरणताई यांच्याशी दिलीप वळसे पाटील यांचा विवाह झाला.
Dilip Walse Patil - Mrs Patil
Dilip Walse Patil - Mrs Patil

वाशीम : राज्यामधे सध्या राजकीय वर्तुळात उलथापालथ जोरात सुरू आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्रिपदाची धुरा देण्यात आली आहे. या नवीन गृहमंत्र्यांच्या गृहमंत्री वऱ्हाडाच्या कारंजा येथील आहेत. स्वातंत्र्यसेनानी उत्तमराव डहाके यांच्या कन्या किरणताई या दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी आहेत. 

राज्यामधे सध्या राजकीय खांदेपालट जोरात आहे. परमविरसिंग यांच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना पायउतार व्हावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्रालय दिलीप वळसे पाटील यांच्या ताब्यात दिले आहे. शांत आणी संयमी राजकारणी म्हणून ओळख असलेले दिलीप वळसे पाटील हे वाशीम जिल्ह्याच्या कारंजा येथील डहाके परिवाराचे जावई आहेत. स्वातंत्र्यसेनानी उत्तमराव डहाके व छबूताई डहाके यांच्या कन्या किरणताई यांच्याशी दिलीप वळसे पाटील यांचा विवाह झाला होता. दिलीप वळसे पाटील यांचे मेव्हणे तथा किरणताई वळसे पाटील यांचे भाऊ हेसुध्दा आमदार होते. कारंजा विधानसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे २०१४ मध्ये आमदार होते. जावई गृहमंत्री झाल्याने कारंजेकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा - 

गृहमंत्री वळसे पाटलांचे कट्टर विरोधक आढळरावांनी केले अभिनंदन 
पारगाव (जि. पुणे) : एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक आणि सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकाच राजकीय व्यासपीठावर आलेले शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपले जुने मित्र दिलीप वळसे पाटील यांचे गृहमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. ट्विटरद्वारे केलेल्या अभिनंदनाची राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे.

दिलीप वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव पाटील एकेकाळचे जीवलग मित्र होते. वळसे पाटील यांनी स्थापन केलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सुरवातीच्या काळात आढळराव पाटील हे अध्यक्ष होते. मात्र, 2004 मध्ये आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला पूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघात विजय संपादन केला. त्यानंतर आढळराव हे तीनदा शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेले. तेव्हापासून उत्तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेत सातत्याने संघर्ष पहायला मिळाला, त्यातूनच दिलीप वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव पाटील या एकेकाळच्या मित्रांमध्ये राजकीय वितुष्ट निर्माण झाले. 

आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक, सहकारी सोसायटी, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, भीमाशंकर साखर कारखान्याची निवडणूक लागली की या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष पहायला मिळायचा. निवडणूक प्रचारात आढळराव पाटील व वळसे पाटील हे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नव्हते. आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचात, पंचायत समिती, जिल्हा परिषद व सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस एकहाती वर्चस्व मिळवत होती; परंतु लोकसभेला मात्र तालुक्यातुन शिवसेनेला आघाडी मिळत होती, याची सल राष्ट्रवादी पक्षात पर्यायाने दिलीप वळसे यांना सातत्याने सलत होती. अशीच स्थिती शिवसेनेची असायची.

लोकसभेला आंबेगावातून आघाडी मिळायची. मात्र, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत व्हायचा. अनेकदा राजकीय क्षेत्रात व्हायची की लोकसभेला आढळरावांच्या विरुध्द वळसे पाटलांना पक्ष उमेदवारी देणार, तर विधानसभेला वळसे पाटलांच्या विरुध्द आढळराव उभे राहणार. पण, हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरुध्द कधीच आले नाहीत. मात्र या दोघांमधील संघर्ष मात्र वर्षांनुवर्ष तीव्र होत गेला. निवडणुका आल्या की दोन्ही नेते एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करत. 

वळसे पाटील हे सलग सात वेळा आंबेगावमधून विधानसभेवर मोठ्या मताधिक्क्याने निवडुन आले. राज्याच्या मंत्रिमंडाळात अनेक महत्वाची खाती त्यांनी सांभाळली. विधानसभेचे अध्यक्षपदही पाच वर्ष त्यांनी यशस्वीपणे सांभाळले. वळसे पाटलांचा राजकीय आलेख  
सातत्याने उंचावत गेला. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत मात्र आढळराव पाटील यांचा पराभव करायचा, याचा चंग राष्ट्रवादी कॉंग्रेसने बांधला. राष्ट्रवादीला डॉ. अमोल कोल्हे यांच्या रुपाने तगडा उमेदवार मिळाला. पक्षाने प्रचाराची धुरा वळसे पाटलांवर सोपवली. वळसे पाटलांनी प्रभावी प्रचारयंत्रणा राबवली आणि आढळराव पाटलांचा पराभव झाला.

त्यानंतर आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यात राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये संघर्ष वाढत गेला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सरकारमध्ये वळसे पाटील मंत्री झाले. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेत एकत्र असली तरी शिरुर लोकसभा मतदारसंघात या दोन्ही पक्षात नेहमी खटके उडत आहेत. आढळराव पाटील व वळसे पाटलांचे सूत काही केल्या जुळत नव्हते. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात आढळराव सुरवातीला अलिप्त होते. त्यानंतर त्यांनी महाविकास आधाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. ग्रामपंचायत निवडणुकीतही तालुक्यातील मंचरसारख्या मोठ्या गावात शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी एकत्र येत या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकहाती सत्ता मिळवली. तालुक्यात काही गावांत महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यानंतर तालुक्यातील या दोन्ही पक्षात काहीसा संघर्ष कमी झाल्याचे दिसू लागले.

मध्यतंरीच्या काळात वळसे पाटील यांना कोरोनोचा संसर्ग झाला होता, त्यावेळीही आढळराव पाटील यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी सोशम मीडियातून शुभेच्छा दिल्या होत्या. आताही वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वाकारल्यानंतर आढळराव पाटील यांनी ट्विटरवरून अभिनंदन करताना म्हटले आहे की, आंबेगाव-शिरुर विधानसभेचे आमदार दिरीपराव वळसे पाटील यांना महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी वळसे पाटील समर्थपणे पेलून पोलिस खात्याचा अभिमान सार्थ ठरवाल, अशी खात्री बाळगतो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com