राष्ट्रवादीचा बावनकुळेंवर पुन्हा प्रहार; प्रवक्ते म्हणाले, विदेशातील गुंतवणूक भोवली.. - ncp also attacks bawankule the spokespersons said that foreign investment is all around | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचा बावनकुळेंवर पुन्हा प्रहार; प्रवक्ते म्हणाले, विदेशातील गुंतवणूक भोवली..

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

त्यांच्या सरकारमधील सर्वाधिक भ्रष्ट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. त्यामुळे पक्षाने त्यांना तिकीट नाकारली होती. कोल वॉशरीचे ठेके आणि त्यांनी विदेशात केलेली गुंतवणूक त्यांना भोवली आहे. ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी बावनकुळे आता पक्षश्रेष्ठींची खुशामत करीत फिरत असल्याची घणाघाती टिका प्रवीण कुंटे यांनी केली आहे.

नागपूर : माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवर अवैध धंदे करीत असल्याचा आरोप केल्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांना सडेतोड प्रत्यूत्तर दिले. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांच्या आरोपांचा समाचार घेतला. त्यानंतर प्रदेश प्रवक्ते नागपुरचे प्रवीण कुंटे यांनी ‘बावनकुळेंना विदेशातील गुंतवणूक भोवली’, असल्याचा पलटवार केला आहे. 

महाविकास आघीडी सरकारवर आरोप केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील मंडळी अक्षरशः तुटून पडली आहे. राज्यात सर्वत्र जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून वाळू चोरी, तस्करी व अवैध धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार विदर्भातील आहेत. मात्र विदर्भातही हाच सावळा गोंधळ सुरू आहे. तस्करी व चोरीत थेट सरकारच सहभागी असल्याने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा प्रशासनाला कारवाई न करण्याचे अलिखित आदेश आहेत. अनैतिकतेतून जन्माला आलेल्या या सरकामध्ये सर्व अवैध कामे सुरू असल्याची टीका बावनकुळे यांनी केली होती. त्यावर त्यांच्या सरकारमधील सर्वाधिक भ्रष्ट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. त्यामुळे पक्षाने त्यांना तिकीट नाकारली होती. कोल वॉशरीचे ठेके आणि त्यांनी विदेशात केलेली गुंतवणूक त्यांना भोवली आहे. ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी बावनकुळे आता पक्षश्रेष्ठींची खुशामत करीत फिरत असल्याची घणाघाती टिका प्रवीण कुंटे यांनी केली आहे. साईबाबा कंपनी कोण चालवते, वीस कोटींचे झाडं लावायला दिले, ते ठेकेदार कोण होते? कुणाचे नातेवाईक? झाडं कुठे आहेत, याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही कुंटे म्हणाले.

 

माजी मंत्री बावनकुळे यांनी सरकारमध्ये सर्वप्रकारचे अवैध धंदे सुरू आहे. त्यासाठी मंत्र्यांनी जिल्हे वाटून घेतल्याचाही आरोप केला होता. फडणवीसांनी कायमस्वरूपी घरी बसवलेल्या बावनकुळेंनी फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर बेताल वक्तव्य केले आहे. परंतु बावनकुळे यांनी याबाबतचे पुरावे द्यावे, अन्यथा सरकारची जाहीर माफी मागावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांना यापूर्वीच दिले आहे. सत्ता गेल्यानंतर आणि स्वतःला व पत्नीला तिकीट न मिळाल्यामुळे मानसिक संतुलन गमावलेल्या अवस्थेत बावनकुळे असावे? म्हणून ते अशी वक्तव्य करत असल्याचे तपासे यांनी म्हटले आहे. 

दोन दिवसांपूर्वीही बानकुळे यांनी महाराष्ट्रात आज मोगलाई सुरू आहे, अशी टीका केली होती. ''आजची स्थिती बघून असे म्हणावे वाटते की, मोगल तरी चांगले होते, इंग्रज तरी चांगले होते, दिलेल्या शब्दाला पक्के राहत होते. पण सध्या महाराष्ट्रात मुगल आणि इंग्रजांपेक्षाही वाईट सरकार आले आहे. आधी सांगितले की चार महिन्यांतील वीज बिलांमध्ये आम्ही दुरूस्ती करू, पण काहीही केले नाही. अतिशय वाईट म्हणजे ९६ लाख परिवारांची वीज कापण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आता येवढ्या मोठ्या संख्येने घरं अंधारात जाण्याची भिती आहे. सरकारने लॉकडाऊनच्या काळातील बिले कमी करुन दिलेली नाहीत. सरकारने दिलेला शब्द फिरवला आहे,'' असे बावनुकळे म्हणाले होते. 

(Edited By : Atul Mehere)

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख