nana patole will send proposal to central government for bharatratna to anna bhau sathe | Sarkarnama

अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न मिळण्यासाठी नाना पटोले देणार केंद्र सरकारला प्रस्ताव

निलेश डोये
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

योगायोगाने समोरच दीक्षाभूमी असून दीक्षाभूमीला येणाऱ्या भाविक व पर्यटकांना अण्णा भाऊंचे साहित्य प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

नागपूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी परिवर्तनाच्या लढाईसाठी आयुष्य वाहून घेतले. सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय आणि साहित्य क्षेत्रातही त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. साहित्य निर्मिती, शाहीर, लोकनाट्य अशा विविध माध्यमांतून त्यांनी समाज प्रबोधन केले. कामगारांना चळवळीसाठी प्रेरणा दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या शाहिरीने प्राण फुंकले. अण्णा भाऊंच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न मिळावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आज म्हणाले.

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नाना पटोले म्हणाले की, अण्णा भाऊंनी बहुजन समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले. आपल्या साहित्यातून समाज प्रबोधन केले. त्यांचे साहित्य आजही दिशादर्शक असून या साहित्याचा शासन मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करणार आहे. त्यांनी केलेले कार्य व साहित्य दीर्घकाळ स्मरणात रहावे, यासाठी अण्णा भाऊंना भारतरत्न पुरस्कार द्यावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येईल. त्याचप्रमाणे दीभूमी चौकातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील जागा ट्रस्टला देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.

आज सकाळी दीक्षाभूमी परिसरात आयोजित अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारोह कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते.

या जागेत अण्णा भाऊ साठेंच्या नावे भव्य ग्रंथालय उभारण्यात यावे, असे ते म्हणाले. योगायोगाने समोरच दीक्षाभूमी असून दीक्षाभूमीला येणाऱ्या भाविक व पर्यटकांना अण्णा भाऊंचे साहित्य प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. यावेळी लहूजी सेनेचे प्रमुख संजय कठाळे, पवन मोरे, विनायक इंगोले, बुद्धजी सूरकार, नरेश कांबळे, मनीष वानखेडे, प्रदीप बोरकर, अशोक भावे आदी पदाधिकारी उपस्थित होते.  (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख