nana patole arrives in delhi, what will happen | Sarkarnama

नाना पटोले पोहोचले दिल्लीत, काय होणार उलथापालथ ?

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 26 मे 2020

राज्यात सुरु झालेल्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर नाना पटोले दिल्लीला गेले असल्याची माहीती हाती आली आहे. या दौऱ्यात नाना पटोले राहुल गांधी आणि पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करणार असल्याचेही काही मंडळींकडून सांगण्यात येते.

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची व्हायरल झालेली ऑडीओ क्‍लीप, "ठाकरे सरकारमध्ये कॉंग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाहीत', असे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले वक्तव्य यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत असतानाच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे राज्य सरकारमधील अस्थिरता वाढत तर नाहीये ना, अशा शंका व्यक्त होऊ लागल्या आहेत. 

आज सकाळीच राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची गरज प्रतिपादीत केली. हे करतानाच त्यांनी स्वपक्षीयांवरही निशाना साधला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात निश्‍चितच काहीतरी उलथापालथ होणार, अशा शक्‍यता वर्तविली जात आहेत. राज्यभर कोरोनाशी लढाई सुरु असताना नाना पटोले दिल्लीत कसे, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता, "त्यांचा तो नियोजित दौरा होता. सहा दिवसांपूर्वीच हा दौरा ठरविण्यात आला होता. त्यानुसार "साहेब' दिल्लीला गेले आहेत. सध्या सुरु असलेल्या घडामोडींशी या दौऱ्याचा काही एक संबंध नाही', असे ठेवणीतले उत्तर नाना पटोलेंच्या एका निकटवर्तीयांने दिले. 

दुसरीकडे राज्यात सुरु झालेल्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर नाना पटोले दिल्लीला गेले असल्याची माहीती हाती आली आहे. या दौऱ्यात नाना पटोले राहुल गांधी आणि पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करणार असल्याचेही काही मंडळींकडून सांगण्यात येते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांची घेतलेली भेट आणि त्यानंतर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतल्यामुळे, राज्याच्या राजकारणात निश्‍चितच "कुछ तो गडबड है', असेही बोलले जात आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही संपर्क करण्याया प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. 

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, थोड्याच वेळात नाना पटोले लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. पावसाळी अधिवेशन जुन महिन्यात घ्यायचे की नाही, यासंदर्भात ते लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा करणार आहेत. मात्र राहुल गांधींसोबत आज नाना पटोलेंची भेट होणार नाही, अशी माहीती आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख