‘नाना भाऊंनी तारतम्य ठेवून बोलावे, नाही तर सत्तेच्या बाहेर पडून दाखवावे...’  - nana bhau should speak with distinction otherwise show out of power | Politics Marathi News - Sarkarnama

‘नाना भाऊंनी तारतम्य ठेवून बोलावे, नाही तर सत्तेच्या बाहेर पडून दाखवावे...’ 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 28 मार्च 2021

महाविकास आघाडी सरकारचे जनक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत, हे साऱ्या देशाला ठाऊक आहे. त्यांनीच राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाला विरोधात बसवले आणि तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात आणले आणि सरकारचे काम यशस्वीपणे सुरू आहे.

नागपूर : शरद पवार राष्ट्रवादीचे की शिवसेनेचे, हे तपासावे लागेल, असे वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल केले. त्यावर नाना भाऊंनी तारतम्य ठेवून बोलावे, नाही तर सत्तेच्या बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे पाटील यांनी पटोले यांना दिले आहे. 

नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये कुंटे पाटील म्हणतात की, ‘श्री नाना भाऊ पटोले यांनी तारतम्य ठेवून बोलावं अशी अपेक्षा आहे. मा. पवार साहेबांमुळेच आज काँग्रेस राज्यात सत्तेमध्ये आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. उगाच धमक्या देण्यापेक्षा सत्तेच्या बाहेर पडून दाखवाच. मग कळेल सर्व’, असे म्हणत कुंटे पाटलांनी थेट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हानच दिले आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादीकडूनही नाना पटोलेंना आव्हानात्मक प्रत्युत्तर दिल्यानंतर हा विषय अजून पेटणार, असे बोलले जात आहे. 

या घडामोडींनंतर महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून बोलले जात आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य आणि त्याला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेले उत्तर, यामुळेही विरोधी पक्षातील नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तुटून पडणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी सरकारचे कामकाज अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये, असेही अजित दादांनी म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खरंच सर्व काही ठीक आहे का, असा प्रश्‍न राजकीय जाणकारांनाही पडला आहे. 

महाविकास आघाडी सरकारचे जनक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत, हे साऱ्या देशाला ठाऊक आहे. त्यांनीच राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाला विरोधात बसवले आणि तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात आणले आणि सरकारचे काम यशस्वीपणे सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांत कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून यामध्ये मिठाचे खडे टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच थेट आव्हान दिले आहे. यावर आता कॉंग्रेसकडून काय प्रतिक्रिया उमटते याची प्रतीक्षा आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख