बावनकुळेंनी कोराडी मंदिराची जमीन विक्रीपत्र न करताच केली भवन्सच्या नावे.. - in the name of bhavans without selling the land of koradi temple | Politics Marathi News - Sarkarnama

बावनकुळेंनी कोराडी मंदिराची जमीन विक्रीपत्र न करताच केली भवन्सच्या नावे..

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

हा संपूर्ण व्यवहार बेकायदेशीररित्या करण्यात आला. जगदंबा संस्थेच्या विश्वस्त मंडळाने जागा देण्याचा ठराव घेतला. हा ठराव जुन्या तारखेत दाखविण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात हा सर्व प्रकार झाल्याचा आरोप सतीष उके यांनी केला.

नागपूर : कोराडी येथील प्रसिद्ध जगदंबा संस्थेच्या विश्‍वस्थ मंडळाने बेकायदेशीररित्या मंदिराची जागा भारतीय विद्या भवन संस्थेला देऊन टाकली. यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला असून विक्रीपत्र न करताच मंदिराची जमीन देण्यात आली आहे. यात मोठी अनियमतता झाल्याचा आरोप करुन कामठी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याची माहिती ॲड. सतीश उके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

ॲड. उके यांनी सांगितले की, कोराडी मंदिरची पाच एकर जागा भारतीय विद्या भवन संस्थेला देण्यात आली. हा संपूर्ण व्यवहार बेकायदेशीररित्या करण्यात आला. जगदंबा संस्थेच्या विश्वस्त मंडळाने जागा देण्याचा ठराव घेतला. हा ठराव जुन्या तारखेत दाखविण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात हा सर्व प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. ही जागा भवन्स संस्थेला ९० वर्षाच्या भाडेतत्वार साडे तीन कोटी रुपयांत देण्यात आली. 

पहिल्या ३० वर्षात ५० लाख, दुसऱ्या ३० वर्षात १ कोटी तर तिसऱ्या तीस वर्षात दीड कोटी रुपये घेण्यात येणार आहेत. खोट्या माहितीच्या आधारे दुय्यम निबंधक, कामठी यांच्याकडे दस्त तयार करून घेतला. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नसलेली अटी व शर्ती बेकायदेशारपणे लिहून भवन संस्थेला जमीन महसूल भरण्याचे अधिकार दिले. भवन यांच्या अर्जावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने जमीन अकृषक करण्याचे प्रमाणपत्र दिले. 

त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी-जाखापूर यांचे नाव सातबारावरून काढून भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्र कोराडी यांचे नाव चढविण्यात आले. कोणत्याही विक्रीपत्राशिवाय भारतीय विद्या भवनच्या नावे जागा करण्यात आली. यात उपविभागीय अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी चुकीची फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांनी केली आहे. यावेळी बेलेकर व विनोद पटोले उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख