नागपुरकरांना आता होतेय तुकाराम मुंढे यांची आठवण... - nagpurkars now remembers tukaram mundhe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

नागपुरकरांना आता होतेय तुकाराम मुंढे यांची आठवण...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 30 मार्च 2021

गेल्या वर्षी तुकाराम मुंढे यांनी नागरिकांचे सर्वेक्षण केले होते. इतर आजार झालेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास त्यांना तत्काळ सुविधा मिळावी हा हेतू होता. पण सध्या हे सर्वेक्षण बंद आहे. ते पुन्हा सुरू करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

नागपूर : मागील वर्षी मे, जून, जुलै महिन्यांत महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बाधितांची संख्या, परिसर, त्यांचे वय, आजार याबाबत दररोज विश्लेषण करणारी एक टीमच तयार केली होती. या विश्लेषणातून ज्या भागांत विविध आजारांनी ग्रस्त किंवा ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात होते, त्यांना तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविले जात होते. त्यांची आठवण आजही अधिकारी काढतात. कोरोना मोठ्या प्रमाणात फोफावत असताना नागरिकही मुंढेंची आठवण काढताना दिसतात. 

सर्वेक्षण सुरू करण्याची गरज 
गेल्या वर्षी तुकाराम मुंढे यांनी नागरिकांचे सर्वेक्षण केले होते. इतर आजार झालेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास त्यांना तत्काळ सुविधा मिळावी हा हेतू होता. पण सध्या हे सर्वेक्षण बंद आहे. ते पुन्हा सुरू करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 

बिगरकोरोना रुग्णांचा डाटाच नाही 
शहरात दररोज तीन हजारांच्या वर कोरोनाबाधित आढळून येत आहेत. यात एक हजारावर विविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना तत्काळ उपचार मिळण्याची गरज आहे. परंतु, महापालिकेकडे त्यांचा ‘डाटा’च नाही. त्यामुळे उपचारास विलंब होत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. महापालिकेच्या नियोजनशून्यतेची किंमत नागरिकांना मोजावी लागण्याची शक्यता बळावली आहे. 

शहरावर कोरोनाने फास आवळला आहे. दररोज तीन हजार बाधित आढळून येत आहेत. या रुग्णांचा डाटा गोळा करून त्यातील विविध आजारांनी ग्रस्त, ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगळी काढून त्यांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी महापालिकेने नियोजन करण्याची गरज आहे. परंतु, दररोज आढळून येणाऱ्या बाधितांच्या संख्येच्या नोंदीपलीकडे महापालिकेचे कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे अधिकारी कुठल्या भागात किती रुग्ण आहेत, त्यातील विविध आजारांनी ग्रस्त, ज्येष्ठ नागरिक किती, याबाबतचे विश्लेषणच करीत नसल्याने तत्काळ उपचाराची गरज असलेल्यांना वेळेत उपचार मिळत नसल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर नमूद केले. यातून मृत्यूची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. किंबहुना, काही जणांचा यातूनही मृत्यू झाल्याचे समजते. दररोज वाढत्या मृत्युसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी बाधितांची संख्या, मोठ्या प्रमाणात बाधित असलेला परिसर, बाधितांचे वय, त्यांचे आजार याबाबतचे विश्लेषण करणे गरजेचे असल्याचेही या अधिकाऱ्याने नमूद केले. 

हेही वाचा : कोरोना चाचण्यांचे रॅकेट? काल पॉझिटिव्ह आज निगेटिव्ह

संपर्क क्रमांकही नाही 
बाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची किंवा उपचाराची गरज पडली तर महापालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्याला फोन करायचा, याबाबत अद्याप महापालिकेने संपर्क क्रमांक जाहीर केले नाहीत. तसे महापौरांनी निर्देशही दिले. पण काहीच झाले नाही. यातून महापालिकेचा कोडगेपणा अधोरेखित झाला.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख