दुपारी एक नंतर विनाकारण रस्त्यांवर दिसल्यास नागपूरकरांना मिळणार ‘प्रसाद’ - nagpuriens will beat by police if they wander after one pm on the roads | Politics Marathi News - Sarkarnama

दुपारी एक नंतर विनाकारण रस्त्यांवर दिसल्यास नागपूरकरांना मिळणार ‘प्रसाद’

अनिल कांबळे
बुधवार, 17 मार्च 2021

लॉकडाउनच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नागरिकांची खरेदीसाठी दिवसभर वर्दळ बघता आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज भाजीपाला, किराणा, फळे, मांस विक्रीच्या दुकानांसाठी निश्चित वेळ ठरवून दिली. आता ही सर्व दुकाने दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू राहतील.

नागपूर : कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याने पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. पण नागरिकांनी हा लॉकडाऊन गांभीर्याने घेतला नाही. शहरात विनाकारण गर्दी करणे सुरूच आहे. काल २५८७ रुग्ण आढळले. हा जिल्ह्यातील उच्चांक आहे. त्यामुळे आजपासून प्रशासन कठोर झाले असून आता दुपारी एकनंतर विनाकारण फिरणाऱ्यांना आता पोलिस ‘प्रसाद’ देणार आहेत. काही उडाणटप्पू युवक पोलिसांना चिडवून, गुंगारा देत उड्डाणपुलांवरून फिरताना आढळले. त्यामुळे शहरातील चौदा उड्डाणपूल बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आजपासून चौथा उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे.  

पोलिस तैनात नसल्याने काही जण थेट खालच्या रस्त्‍याने न जाता थेट उड्डाणपुलांवरून वाहने सुसाट चालवत पोबारा करीत आहेत. यावर उपाय म्हणून आजपासून शहरातील १७ पैकी १४ उड्डाणपूल बंद ठेवण्यात येणार आहेत. अत्यावश्यक दुकानांची वेळ दुपारी एक वाजेपर्यंत निश्चित केल्याने पोलिस बंदोबस्तात मोठा बदल करण्यात आला आहे. नाकाबंदीची संख्या वाढविण्यात आली असून पोलिस कर्मचारी आता दंडुक्यांसह रस्त्यावर दिसणार आहेत. कुणीही विनाकारण रस्त्यावर दिसल्यास त्याला पोलिसांचा ‘प्रसाद’ देण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. 

दारूच्या तीन दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव 
मद्यविक्री करताना कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दारूच्या तीन दुकानांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली. टाळेबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा, उद्योग, बांधकाम क्षेत्र व खासगी कार्यालयांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. पण, या सेवांच्या नावाखालीही काहीजण अतिरेक करीत असल्याने कारवाईचा प्रभाव वाढवण्यात आला. मंगळवारी प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एचडीएफसी फायनान्स आणि सिंधी हिंदी शाळेच्या परिसराची पाहणी केली. आता खासगी कार्यालयांची झाडाझडती करण्यात येईल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. 

हेही वाचा : `सुपर स्प्रेडर्स’ रोखण्यासाठी नाशिकला तीस पथके

१ वाजेपर्यंतच खुली राहतील भाजीपाला,किराणा दुकाने 
लॉकडाउनच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नागरिकांची खरेदीसाठी दिवसभर वर्दळ बघता आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज भाजीपाला, किराणा, फळे, मांस विक्रीच्या दुकानांसाठी निश्चित वेळ ठरवून दिली. आता ही सर्व दुकाने दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू राहतील. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी अत्यावश्यक सेवेची दुकाने दिवसभर सुरू असल्याने नागरिकांची वर्दळ सुरू होती. काल दुसऱ्या दिवशीही यात फारसा फरक दिसून न आल्याने आयुक्तांनी हा निर्णय घेतला.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख