नागपुरी संत्र्याला सन्मान मिळवून देण्यासाठी संत्री वाटणारा एक आमदार 

सुनील शिंदे 1985 ते 1995 या दहा वर्षांच्या काळात दोन वेळा काटोल मतदारसंघातून आमदार झाले. या काळात त्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान संत्री वाटप केलीच. परंतु त्यांनी घेतलेले हे व्रत पुढे अंखडितपणे सुरूच ठेवले. पुढे-पुढे मग त्यांनी संत्र्याचा रसही वाटपही सुरू केले. गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या अधिवेशादरम्यानही त्यांनी स्वतः अधिवेशनस्थळी रस वितरित केला.
Sunil Shinde _ R R Patil
Sunil Shinde _ R R Patil

नागपूर : एक आमदार हिवाळी अधिवेशनात मंत्री आणि आमदारांनाही संत्री देतो. एवढेच काय तर विविध सरकारी खात्यांचे सचिव आणि अधिकारी यांनाही न विसरता संत्री देतो. हे काय अफलातून व्यक्तिमत्व आहे, असा प्रश्‍न सर्वांनाच पडतो... आणि मग हळूहळू "संत्री वाटणारा आमदार' अशी त्यांची ओळख निर्माण होते. मग दर हिवाळी अधिवेशनात मंत्री, आमदार, अधिकारी संत्री मिळतील, म्हणून या आमदारांची वाट बघतात. संत्री मिळताच ते आनंदतात. अनेकजण मग गावी जाताना या आमदारांनी दिलेली संत्र्याची पेटीही सोबत नेतात. कोण होते हे आमदार?... आणि का वाटत होते संत्री..? 

विदर्भातील संत्री देश-विदेशात प्रसिद्ध आहे. "नागपुरी संत्री' असा उल्लेखच मुळी संत्रा या फळाचा होतो. विदर्भात संत्री होतात, ते मुख्यतः "काटोल-नरखेड-वरूड-मोर्शी' या पट्ट्यात. या पट्ट्यात शेकडो नव्हे, तर हजारो संत्रा बागायतदार आजही आहेत. ज्या भागात संत्री होतात, त्या भागात मात्र संत्र्याला प्रतिष्ठा नव्हती. "पिकते तिथे खपत नाही' असे म्हणतात. "गावची गंगा टोंगळ्याले सांगा' असाही एका वाक्‍प्रचार प्रचलित आहे. संत्र्याचीही तशीच अवस्था होती. देशभर "नागपुरी संत्री' म्हणून ओळख असलेल्या संत्र्यांची ही उपेक्षा त्या आमदाराला सहन झाली नाही. मग त्याने एक रणनीती आखली. काय होती ती रणनीती...? 

ेते होते काटोल मतदारसंघाचे आमदार. 1985 मध्ये पहिल्यांदा ते आमदार झाले. परंतु, खऱ्या अर्थाने ते शेतकरी होते. तेही संत्रा बागायतदार शेतकरी. तो पट्टाच संत्रा उत्पादकांचा होता. अमरावती जिल्ह्यातील वरूड, मोर्शी येथे आणि नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल येथे संत्र्याची मोठी व्यापारपेठ होती. त्याला "संत्रा मंडी' म्हणायचे. या मंडीत हजारो टन संत्रीचा उठाव व्हायचा. परंतु, शेतकऱ्याला कवडीमोल मोबदला मिळायचा. व्यापारी कमी दराने संत्री खरेदी करायचे आणि पुढे निर्यात करताना मात्र अव्वाच्या सव्वा भाव मिळवायचे. हे बघून हे आमदार हळहळायचे. स्वतःच्या शेतीतील उत्तम दर्जाच्या संत्र्यालाही व्यापारी भाव देत नाहीत म्हणून व्यथित व्हायचे. मग त्यांनी एक निर्धार केला. काय होता तो निर्धार...? 

सारे सभागृह घ्यायचे संत्र्याची बाजू 
नागपुरी संत्र्याला प्रतिष्ठा निर्माण करुन द्यायची. केवळ प्रतिष्ठा नव्हे तर, संत्री उत्पादकांना त्यांच्या संत्र्याचा योग्य भावही मिळवून द्यायचा. एकूणच काय तर शेतकऱ्याला त्याच्या घामाचे दाम मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी केला...आणि त्यासाठीच त्यांनी रणनीती आखली. म्हणूनच मग "नागपुरी संत्री' त्यांनी थेट मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे सुरू केले. त्यामुळे नागपुरी संत्र्यांची चर्चा सभागृहाबाहेर होऊ लागली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर अधिवेशनात त्यांनी संत्र्याला भाव मिळवून देण्यासाठी आवाजही मांडणे सुरू केले. मग हे आमदार बोलताना अख्खे सभागृह...मग विरोधी पक्षाचे आमदार का असेना...या आमदारांची बाजू घ्यायचे. अर्थात संत्र्याची बाजू घ्यायचे...एवढ्यावरच थांबतील तर ते "सोनुबाबा' कसले? होय सोनुबाबा...आमदार सुनील शिंदे उर्फ सोनुबाबा...मग काय केले आणखी त्यांनी..? 

दिल्लीपर्यंत मांडला संत्र्याचा आवाज 
संत्र्याला असा भाव मिळत नाही का? मग संत्र्यावर प्रक्रिया केली. त्याचा "रस' काढला तर? तो सीलबंद करून विकला तर? संत्र्याला चांगला भाव मिळू शकतो.. आणि संत्र्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प सुरू करताना, यात शेतकऱ्यांचेच "शेअर्स' असले तर? शेतकऱ्यांना उत्तम भाव मिळेल आणि प्रक्रिया उद्योगातून जो नफा मिळेल, त्याचा "शेअर'ही शेतकऱ्यांच्या पदरात पडेल, असा विचार सुनील शिंदे यांनी केला. अधिवेशन काळात त्यांनी संत्री वाटून राज्य सरकारचे लक्ष तर वेधलेच होते. मग त्यांनी एका ज्येष्ठ नेत्याकडे या प्रक्रिया उद्योगासाठी निधी देण्याची गळ घातली. सोनुबाबांची दिलदारी बघत त्या नेत्याने तडाक्‍यात प्रक्रिया उद्योगासाठी निधी मंजूर केला....कोण होते ते नेते..? 

रणनीती आली फळास.. 
देशाचे कृषी मंत्री असलेले शरद पवार यांना सुनील शिंदे दिल्लीत भेटले. त्यांना संत्र्याची ही अवस्था समजावून सांगितली. संत्र्यावर असलेली ही अवकळा शरद पवार जाणून होतेच. त्यांनी तातडीने 20 कोटी रुपये संत्रा प्रक्रिया केंद्रासाठी मंजूर केले... आणि अशा तऱ्हेने सोनुबाबांनी संत्र्याला प्रतिष्ठा आणि शेतकऱ्याला योग्य भाव मिळण्यासाठी आखलेली रणनीती फळास आली...काटोल तालुक्‍यात संत्रा प्रक्रिया प्रकल्प थाटात उभा झाला. 

...आता उरल्या फक्त आठवणी 
सुनील शिंदे 1985 ते 1995 या दहा वर्षांच्या काळात दोन वेळा काटोल मतदारसंघातून आमदार झाले. या काळात त्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान संत्री वाटप केलीच. परंतु त्यांनी घेतलेले हे व्रत पुढे अंखडितपणे सुरूच ठेवले. पुढे-पुढे मग त्यांनी संत्र्याचा रसही वाटपही सुरू केले. गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या अधिवेशादरम्यानही त्यांनी स्वतः अधिवेशनस्थळी रस वितरित केला. आज गुरुवार 11 जून रोजी सुनील शिंदे यांची प्राणज्योत मावळली. यापुढील अधिवेशनात संत्री किंवा संत्र्याचा रस वाटणारे सोनुबाबा कुणाला दिसणार नाहीत. परंतु जेव्हा-जेव्हा संत्री दिसतील, जेव्हा-जेव्हा संत्र्याचा रस पुढ्यात येईल, तेव्हा-तेव्हा जुन्या जाणत्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना आणि एवढेच काय तर या अधिवेशनाच्या इमारतीलाही संत्र्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या लाडक्‍या सोनुबाबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com