सायबर गुन्हेगारांच्या टारगेटवर उपराजधानी ! - nagpur on the target of cyber criminals | Politics Marathi News - Sarkarnama

सायबर गुन्हेगारांच्या टारगेटवर उपराजधानी !

अनिल कांबळे
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

गुन्हे शाखा आणि किचकट तपासात ‘महारथ’ प्राप्त असलेल्या पोलीस निरीक्षकांसमोर एटीएम हॅकर्सच्या टोळीचे मोठे आव्हान आहे. हॅकर्सच्या टोळीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. ठाणेदारांना तर न सुटण्यासारखे कोडे आहे.

नागपूर : देशाच्या विविध राज्यांत सायबर गुन्हे केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी आता महाराष्ट्राच्या उपराजधानीकडे मोर्चा वळवला आहे. हे गुन्हेगार उत्तर भारतातील असल्याची माहिती आहे. या टोळ्या विमानाने नागपुरात येतात आणि रातोरात एटीएम लुटून चालले जातात. या टोळ्यांनी विशिष्ट बॅंकांच्या एटीएमला टारगेट केले आहे. टेक्निकल एक्सपर्ट असलेले गुन्हेगार बॅंकेच्या एटीएममधून लाखो रुपये काढून मोठमोठ्या बॅंकांची फसवणूक करीत आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली, पंजाब, हरयाणा, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील सायबर गुन्हेगारांनी संपूर्ण भारतात हैदोस घातला आहे. टेक्निकल एक्सपर्ट असलेल्या सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर सध्या महाराष्ट्र राज्य असून चक्क नागपूर शहराला प्राधान्य दिले असल्याची माहिती आहे. सायबर गुन्हेगार थेट विमानाने उपराजधानी गाठतात. दिवसाला ५ ते ८ हजार रुपये भाडे असलेल्या वर्धा रोडवरील मोठमोठ्या पॉश हॉटेलमध्ये थांबतात. त्यानंतर टोळी तयार करून भाड्याने कार किंवा बाईक घेतात. संपूर्ण शहराची ‘रेकी’ करतात. त्यानंतर त्यांच्या टार्गेटवर आलेल्या एटीएमची माहिती गोळा करतात. एटीएम हॅक करण्यासाठी लागणाऱ्या सामानाची किट त्यांच्याकडे असते. शहरातील विशिष्ट बॅंकेलाच ते चुना लावतात. आतापर्यंत शहरात एटीएम हॅक करून पैसे काढल्याच्या जवळपास १० ते १२ घटना उघडकीस आल्या आहेत. 

असे काढतात लाखो रुपये 
पहाटे चार ते पाच वाजताच्या सुमारास एटीएममध्ये टोळी घुसते. एक जण बाहेर असतो तर दुसरा एटीएमशी छेडछाड करून पैसे काढतो. मशिनमधून एक ते दोन लाखांची रक्कम काढली जाते. ग्राहकांचे कोणतेही नुकसान न करता केवळ पैसे काढले जातात. ती सर्व रक्कम थेट बॅंकेच्या खात्यातून काढली जात असल्यामुळे बॅंक प्रशासनाच्या लवकर लक्षात येत नाही. 

हरयाणा राज्यातील मेवात जिल्ह्यातील अनेक अल्पशिक्षित युवक बॅंक एटीएम हॅकिंगमध्ये एक्सपर्ट आहेत. ते युवक तांत्रिक ज्ञान प्राप्त करून एटीएम हॅकिंगचे प्रशिक्षण घेतात. त्यानंतर बेरोजगार असलेला युवक केवळ वर्षभरात कोट्यधीश बनतो. या काळ्या कमाईतून एक्सपर्ट युवकांनी मोठमोठे बंगले बांधले असल्याची माहिती आहे. महागड्या स्टायलीश कार खरेदी करतात. तसेच ते विमान प्रवास आणि महागड्या हॉटेल आणि डान्सबारमधे पैसे उडवितात. 

गुन्हे शाखेला आव्हान 
गुन्हे शाखा आणि किचकट तपासात ‘महारथ’ प्राप्त असलेल्या पोलीस निरीक्षकांसमोर एटीएम हॅकर्सच्या टोळीचे मोठे आव्हान आहे. हॅकर्सच्या टोळीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. ठाणेदारांना तर न सुटण्यासारखे कोडे आहे. त्यामुळे हॅकर्सच्या टोळीच्या प्रतिबंध घालणे नव्या पोलीस आयुक्तांसमोर आव्हान आहे.      (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख