नागपूरकरांनी उधळला महापौरांचा जनता कर्फ्यू..

पोलिस आयुक्तांनी संकटाच्या वेळी पत्रक काढून जनता कर्फ्यूला मदत नाकारली तर मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत निर्णय झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी त्यांचाही सूर बदलला, असा आरोपही आमदार खोपडे यांनी केला.
Mayor Carfue
Mayor Carfue

नागपूर : कोरोनाच्या संक्रमणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दर तासाला दोन रुग्णांचा मृत्यू होत आहे. मरणाऱ्यांच्या संख्या दोन हजाराच्या पार गेली आहे. अशा स्थितीत महापौर संदीप जोशी यांनी शनिवार आणि रविवार, असे दोन जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. नागपूरकरांनी शनिवारी थोडाबहुत प्रतिसाद दिला. परंतु काल रविवारी महापौरांचा जनता कर्फ्यू पार उधळून लावला. त्यामुळे महापौर आणि एकंदरीत पालिकेच्या कामावर जनता विश्‍वास करते की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

नागरिकांच्या आरोग्यासाठी घोषित केलेल्या जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी नागपूरकरांनी रविवारची सुटी दणक्यात साजरी केली. शनिवारच्या अल्प प्रतिसादानंतर रविवारी जनता कर्फ्यू उधळून लावत नागरिकांनी दिवसभर रस्त्यांवर गर्दी केली. सायंकाळी अनेक जण कुटुंबाला घेऊन चटपटीत खाण्यासाठी बाहेर पडल्याने पाणीपुरी स्टॉल, चायनीज स्टॉलला जत्रेचे स्वरूप आले होते. सुटी असल्याने दुकानांमध्येही आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी दिसून आली. 

शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तासाला दोघांचा मृत्यू होत असून दररोज दीड ते दोन हजार बाधित आढळून येत आहेत. अजूनही अकरा हजारांवर बाधित उपचार घेत आहेत. प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही कोरोनावर अद्याप नियंत्रण आले नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे. या पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी यांनी सप्टेंबरमधील शनिवार, रविवारी जनता कर्फ्यूची घोषणा केली. काल, शनिवारी काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी मात्र मुक्त संचार सुरूच ठेवला. ज्यांनी काल मुक्त संचार केला, ते आजही बाहेर पडले. तर काल घरात बसून जनता कर्फ्यूला प्रतिसाद देणारे आज बाहेर पडले. त्यामुळे रस्त्यांवर वाहने, नागरिकांची गर्दी दिसून आली. अनेक जण सुटीचा दिवस असल्याने घरात लागणाऱ्या आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडले. 

शहरातील प्रमुख बाजारपेठा आज बंदच असल्याने त्या भागांत नागरिक फिरकले नाही. मात्र, किरकोळ कपड्यांची दुकाने, भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांची दुकाने सुरू असल्याने नागरिकांनी तेथे गर्दी केली. सायंकाळीही चटपटीत खाण्यासाठी नागरिकांनी स्टॉलवर गर्दी केली. महापौर संदीप जोशी यांनी काल, नागरिकांचे आभार मानले होते. परंतु, आज जनतेनेच कर्फ्यू उधळून लावला. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याबाबतही नागपूरकर गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोनामुळे दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाला. अशा स्थितीतही नागपूरकर ऐकत नसतील तर त्यांची कुठल्या भाषेत समजूत काढावी, असा प्रश्न महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, आमदारांपुढे निर्माण झाला आहे. 

जनता कर्फ्यू अपयशी करण्याचा प्रयत्न : आमदार खोपडे 
शहराच्या जनतेने दोन दिवस जनता कर्फ्यूचे स्वागत केले. परंतु, राज्य सरकारने पालिका प्रशासनाला हाताशी धरून जनता कर्फ्यू अपयशी करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावून कूटनीती व दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. पोलिस आयुक्तांनी संकटाच्या वेळी पत्रक काढून जनता कर्फ्यूला मदत नाकारली तर मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत निर्णय झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी त्यांचाही सूर बदलला, असा आरोपही आमदार खोपडे यांनी केला.

पुढच्या शनिवार, रविवारी काय ?
पुढील २६ आणि २७ सप्टेंबरला जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० पासून ते सोमवारी २८ सप्टेंबरला सकाळी ७.३० पर्यंत जनता कर्फ्यू राहणार आहे. त्यावेळी जनता कसा प्रतिसाद देईल, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.         (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com