नागपूर पोलीसानी शहराची ‘क्राईम कॅपिटल’ ही ओळख पुसली : अनिल देशमुख 

पोलीस आयुक्तांनी शहरासाठी स्वतंत्र ‘सायबर पोलीस ठाणे’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्यामुळे सायबर प्रकरणांचा तपास सायबर पोलीस ठाण्यातूनच होईल. यामुळे सायबर गुन्हेगारीला निश्चितच चाप बसेल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.
Anil Deshmukh - Police
Anil Deshmukh - Police

नागपूर : कोरोना संकटाच्या काळात चोख सुरक्षा व्यवस्था नागपूर पोलीसांनी ठेवलीच, पण हे करताना शहरात गुन्हेगारी वाढू नये, याचीदेखील काळजी घेतली. दुहेरी कामगिरीत त्यांनी यश मिळविले. पूर्वी नागपुरला ‘क्राईम कॅपिटल’ संबोधले जायचे. पण काही महिन्यांतच नागपूर पोलीसांनी शहराची ती ओळख पुसून काढली. यासाठी पोलीसांचा गौरव करावा, तेवढा कमीच आहे, अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर पोलीसांचे कौतुक केले. 

शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम नागपूर शहर पोलीस उत्तम प्रकारे करीत आहेत. त्यासाठी पोलीस विभाग राबवत असलेल्या उपाययोजना आणि उपक्रम प्रशंसनीय आहेत, असेही ते म्हणाले. नागपूर शहरांतर्गत कायदा व सुव्यवस्था, दाखल गुन्हे, प्रतिबंधक कारवाई, गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत गृहमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयाच्या सभा कक्षात आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रभारी सहआयुक्त निलेश भरणे, अपर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) राकेश ओला, पोलीस उपायुक्त विनिता साहू, विवेक मसाळ, श्री. निलोत्पल, गजानन राजमाने, विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत आदी बैठकीला उपस्थित होते. 

श्री. देशमुख म्हणाले, कोरोनाच्या संकट कालावधीत जनजागृती करुन चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या जबाबदारीसह वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची दुहेरी कामगिरी नागपूर शहर पोलीस पार पाडीत आहेत. पूर्वी शहराला ‘क्राईम कॅपीटल’ म्हणून संबोधले जात होते. परंतु आता पोलीसांच्या उत्तम कामगिरीमुळे ही प्रतिमा बदलली आहे. नागपूर शहर तसेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीसांना यश आले आहे. तसेच लॉकडाऊन काळात शेल्टर होममधील नागरिकांची पोलीस विभागाने चांगली व्यवस्था केली. इतर राज्यांतील नागरिकांना स्वगावी जाण्यासाठी रेल्वे तसेच बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. या काळात शहरातील कोणतीही गोरगरीब व्यक्ती उपाशी राहणार यासाठी पोलीसांनी कटाक्षाने लक्ष पुरविले. 

सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे असून सायबर क्राईम, हॅकींग आदी प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरासाठी स्वतंत्र ‘सायबर पोलीस ठाणे’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्यामुळे सायबर प्रकरणांचा तपास सायबर पोलीस ठाण्यातूनच होईल. यामुळे सायबर गुन्हेगारीला निश्चितच चाप बसेल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत विविध उपाययोजना तसेच उपक्रम राबविले जातात. ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखेत प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये पोलीस स्टेशनमधील अभिलेखावरील असलेल्या सर्व गुन्हेगारांची तपासणी करण्यात येते. 

संशयित हालचाली किंवा सराईत असल्याचे आढळल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. ‘ऑपरेशन वाईप आऊट’अंतर्गत लपूनछपून अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द धाडसत्र राबविण्यात येते. ‘गुन्हेगार दत्तक योजना’ सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कार्यान्वित असून येथील कर्मचारी नेमून दिलेल्या आरोपींची नियमित तपासणी करुन त्यांच्यावर पाळत ठेवतात. नागपूर शहरात ‘स्मार्ट सीटी प्रोजेक्ट’अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामध्ये मुख्य चौकात फेस रिकगनेशन, नंबर रिकगनेशन कॅमेरे कार्यान्वित आहेत. या अंतर्गत ‘सी.ओ.सी. संपर्क पथका’मुळे शहरातील बरेच गुन्हे उघडकीस आले आहेत. 

रात्रीच्या वेळी महिलांना घरी जाण्यास साधन उपलब्ध नसल्यास फोनद्वारे नियंत्रण कक्षास माहिती मिळाल्यास ‘होम ड्रॉप’ योजनेद्वारे त्यांना तात्काळ वाहन पाठवून महिला पोलीसांसह घरी सोडण्यात येते. तसेच ‘वुमन हेल्पलाईन’ क्रमांक 1091 / 0712-2561222 कार्यान्वित असून 24 तास सुरु आहे. तक्रारी आल्यास तत्काळ त्या ठिकाणी जाऊन कार्यवाही करण्यात येते. या योजनेचा महिलांना खुप फायदा होत आहे. तसेच ‘ऑपरेशन स्ट्रीट ड्राईव्ह’, ‘हिट स्कॉट’, ‘इंटेलिजन्स पथक’, ‘सराईत गुन्हेगारांचे डोजीयर्स’, ‘अंमली पदार्थ विरोधी पथक’, ‘फरार पाहिजे आरोपी अटक पथक’, ‘छात्र पोलीस उपक्रम’, तसेच ‘स्टॅर्न्डड कम्युनिटी पोलीसींग स्कीम्स’ यांसारखे उपक्रम शहर पोलिसांतर्फे राबविण्यात येत आहेत. या योजनांमुळे तसेच नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे खून, मालमत्ताविषयक तसेच महिला व मुलींच्या बाबतीतील गुन्ह्यात घट होत आहे, अशी माहिती डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी यावेळी दिली. कोरोना संसर्गामुळे दगावलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान शेजुळ, तसचे पोलीस हवालदार सिध्दार्थ सहारे यांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com