my yard is my battlefield just to hide the carrots of the package said mp balu dhanorkar | Sarkarnama

पॅकेजचे गाजर लपविण्यासाठीच "माझे आंगण माझे रणांगण' : खासदार बाळू धानोरकर 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 27 मे 2020

हे पॅकेज म्हणजे राजकीय स्वार्थापोटी जाहीर केलेली फसवी आकडेवारी आहे आणि फडणवीसांनी केलेले आंदोलन त्यांची निघालेली बौद्धीक दिवाळखोरी सिद्ध करीत आहे. राज्यातील सत्ता हातून गेल्यामुळे भाजपचे राज्यातील नेते कासाविस झालेले आहेत.

वणी (जि. यवतमाळ) ः केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेले 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज कसे फसवे आहे, हे सांगत कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारवर आज निशाना साधला. पॅकेजचे दिलेले गाजर लपविण्यासाठीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वात "माझे आंगण माझे रणांगण' आंदोलन करण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 

धानोरकर म्हणाले, हे पॅकेज म्हणजे राजकीय स्वार्थापोटी जाहीर केलेली फसवी आकडेवारी आहे आणि फडणवीसांनी केलेले आंदोलन त्यांची निघालेली बौद्धीक दिवाळखोरी सिद्ध करीत आहे. राज्यातील सत्ता हातून गेल्यामुळे भाजपचे राज्यातील नेते कासाविस झालेले आहेत. काहीही करुन सत्ता हस्तगत करण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. परंतु त्यांचे प्रयत्न फळास येणार नाहीत. यासंदर्भात आज त्यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ प्रसारीत केला. 

गेल्या दोन महिन्यांपासून संपुर्ण देश कोरोना महामारीचा सामना करीत आहे. कोरोनाला आळा घालण्याचा आटोकाट प्रयत्न राज्य सरकार कडून केला जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासुन कोरोनावरुन राज्यात राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारने देश बळकट करण्याकरीता नुकतेच विस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमधून ग्रामीण व कृषी व्यवस्था बळकट होणे अपेक्षीत होते. सद्यस्थितीत दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना पॅकेजमधून राज्य सरकारला किती वाटा मिळेल, याबाबत पॅकेजमध्ये सुस्पष्टता नाही. देशाची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झाली असताना केंद्र शासन देशवासीयांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोप खासदार धानोरकर यांनी केली. 

सत्ता गमावल्यामुळे राज्यातील विरोधक कासाविस झाले आहेत. याच फडणविसांनी नैसर्गीक आपत्तीच्या वेळी राजकारण न करण्याची विनंती सर्व पक्षांचे नेते व विरोधकांना केली होती. आता त्यांना विसर पडल्याचे दिसत आहे. भाजपाच्या आंदोलनामुळे आरोग्य विभाग, पोलीस व अन्य विभागांतील कोरोना योध्यांचा यांचा घोर अपमान झालेला आहे. भविष्यात महाराष्ट्रातील जनता भाजपच्या नेत्यांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असेही खासदार धानोरकर म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख