municipal corporation taxes do not increase due to scams said prashant pawar | Sarkarnama

घोटाळ्यांमुळेच वाढत नाही महानगरपालिकेतील कर : प्रशांत पवार 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 1 जुलै 2020

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुमारे एक लाख मालमत्ता कर प्रणालीतून सुटल्या होत्या, हे मान्य केले. त्या सर्व वास्तुंवर नियमानुसार कर आकारणी करण्यात येईल. अनधिकृत इमारती व अनधिकृत वापरावरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन मुंढे यांनी यावेळी जय जवान जय किसान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. 

नागपूर : महानगरपालिकेतील घोटाळेबाज आणि सदोष कर संकनल पद्धती असल्यामुळे अपेक्षित कर वसुली होता नाही. या घोटाळेबाजांना चाप लावून वसुली पद्धत सुधारल्यास पालिकेला करातून मिळणारे उत्पन्न वाढू शकते. सुमारे पाच हजार कोटींची मालमत्ता कर गोळा करण्याची क्षमता शहराची असताना महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे फक्त चारशे ते पाचशे कोटी उत्पन मिळते, असा आरोप जय जवान जय किसान संघटनेतर्फे करण्यात आला. कर संकलन पद्धती सुधारल्याशिवाय शहराचा विकास आणि मनपाचे उत्पन्न वाढणार नाही असाही दावा करण्यात आला. 

जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात समन्वयक विजयकुमार शिंदे, मिलिंद महादेवकर, मंगेश पात्रीकर यांनी सोमवारी कर संकलनाबाबत आज आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. शहरात जवळपास 95 टक्के व्यावसायिक प्रतिष्ठानांची कर आकारणी निवासी दराने होते. महापालिकेचेच अधिकारी त्यांना तसा सल्ला देतात. अचानकपणे एकाद्या वॉर्डाची पडताळणी केल्यास मोठे घबाड उघडकीस येऊ शकते. 2121 कोटी रुपयांचे सर्व देयकांचे ऑडिट टेक्‍निकल व फायनांशियल तज्ञांच्या समितीमार्फत केल्यास कंत्राटदारांना कशा पद्धतीने देयके दिली जातात हेसुद्धा उघडकीस येऊ शकते. 

नंदलाल कमेटीने अशाच पद्धतीने अनेक ठेकेदारांवर कारवाई केली होती. महापालिकेत पथदिवे, पाणी, मालमत्ता विभागात मोठे घोटाळे झाले असून याचे आर्थिक सर्वेक्षण करण्याची मागणीही प्रशांत पवार यांनी आयुक्तांकडे केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुमारे एक लाख मालमत्ता कर प्रणालीतून सुटल्या होत्या, हे मान्य केले. त्या सर्व वास्तुंवर नियमानुसार कर आकारणी करण्यात येईल. अनधिकृत इमारती व अनधिकृत वापरावरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन मुंढे यांनी यावेळी जय जवान जय किसान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख